यंदा दीपावली सरत असतानादेखील थंडीचा अनुभव अद्यापि घेता येईना. सोलापुरातील तापमान ३६ अंश सेल्सियसच्या घरात असल्याने सारेजण थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु येथील थंडीचा मोसम गृहीत धरून सबेरियासारख्या दूरच्या भागातून सोलापूरच्या हिप्परगा तलाव परिसरात फ्लेिमगो (अग्निपंख) हे परदेशी पक्षी दाखल झाले आहेत.
हिप्परगा तलावासह उजनी धरण परिसरातही फ्लेिमगो पक्षी दाखल होऊन निसर्गप्रेमींना साद घालत आहेत. वाढत्या जलप्रदूषणामुळे फ्लेिमगो पक्ष्यांची सोलापुरात येण्याची संख्या मात्र घटत चालली आहे. याबाबतची माहिती पक्ष्यांसह एकूणच पर्यावरणाचे अभ्यासक पांडुरंग दरेकर यांनी दिली.
भल्या सकाळी फ्लेिमगो पक्ष्यांनी आपले पंख फुलविल्यानंतर आतील लालभडक रंगाची होणारी पखरण हे दृश्य मनमोहक असते. तलाव परिसरात आपले खाद्य मिळविण्यासाठी विणीच्या हंगामात फ्लेिमगो पक्षी दरवर्षी हिवाळ्यात सुमारे चार हजार किलोमीटर अंतर कापून सोलापुरात येतात. पाण्यातील विशिष्ट प्रकारचे शाकाहारी शेवाळ हे त्यांचे खाद्य असते. भारतात गुजरात, राजस्थान भागात या पक्ष्यांचा वावर असतो. सोलापुरातून नंतर हे पक्षी पुढे दक्षिणेकडे जातात. पांडुरंग दरेकर हे पक्षीतज्ज्ञ डॉ. अरिवद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षी व पर्यावरण विषयावर पीएच.डी. करीत आहेत.