अन्न व औषध प्रशासनाच्या कोल्हापूर कार्यालयाने श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर येथील एम. बी. परीख अँड सन्सच्या दोन गोदामावर ४ नोव्हेंबर रोजी छापे टाकून अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ च्या तरतुदीचा भंग केलेल्या तसेच अंतिम वापराचा दिनांक संपल्यानंतरसुद्धा विक्रीकरिता साठविलेल्या १० लाख ३८ हजार १६४ रुपये किमतीचा १७ हजार ८३८ किलो चणाडाळ, तांदूळ व लाख डाळीचा साठा जप्त केला. या छाप्यात सात नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालातील निष्कर्षानुसार सदर पेढीविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे असे अन्न व औषध प्रशासन (म.रा.), कोल्हापूरचे सहायक आयुक्त (अन्न) सं. मा. देशमुख यांनी गुरुवारी सांगितले.
अन्न सुरक्षा अधिकारी श्रीनिवास केदार यांनी सहायक आयुक्त संपत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली टाकलेल्या छाप्यात सदरहू गोदाम विनापरवाना चालू असल्याचे आढळले. या गोदामात आयात केलेल्या ६ लाख ११ हजार ३७६ रुपये किमतीचा १० हजार १९२ किलो चणा डाळीच्या बॅग्जवर टांझानियातून आयात केल्याचा उल्लेख होता. परंतु सदरची चणाडाळ नेमकी कोणी आयात केली याची माहिती नसल्याने नमुने विश्लेषणाकरिता घेऊन साठा जप्त केला. तसेच प्लॉट नं. ८० येथे छापा टाकून तेथे लाख डाळीच्या बँग्जवर चणाडाळ कोणी, केव्हा बनविली, त्याची वापरण्याची मुदत याचा तपशील नसल्याने ७३ हजार ३४४ रुपये किमतीची १ हजार ५२८ किलो लाखडाळ जप्त केली. तांदळाच्या बँग्जवर बॅच नंबर व उत्पादन दिनांक नमूद नसल्याने ४० हजार २०४ रुपये किमतीचा १ हजार ७४८ किलो तांदळाचा साठा जप्त केला.
ही कारवाई सहायक आयुक्त संपत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीनिवास केदार,  संतोष सावंत व नमुना सहायक शिवाजी तोडकर यांच्या पथकाने केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food drug administration raid on warehouse in kolhapur
First published on: 07-11-2015 at 03:05 IST