हिमाचल प्रदेशातील शेरी, मध्य प्रदेशातील गीर या नामशेष होणा-या देशी गाईंचे संवर्धन करण्याबरोबरच त्यांच्या तुपाला तब्बल १५०० रुपये किलो दर मिळवून देण्याचे बहुमूल्य काम येथील कणेरी मठाचे श्री काडसिध्देश्वर महास्वामी यांनी केले आहे. तर, बंद पडू लागलेल्या कर्नाटकातील देशी गायपालनाला त्यांनी असाच आयाम मिळवून देत अर्थव्यवस्थेला बळकटी मिळवून दिली आहे. या माध्यमातून कणेरी मठ गायपालनातून शेतकरी, आदिवासी यांच्या घरी लक्ष्मीचा वास मिळवून देण्यात यशस्वी होताना दिसत आहे.
टाळकुटी धर्मपरायणता न करता व्यावहारिकदृष्टय़ा कामाला महत्त्व प्राप्त करून देण्याची दृष्टी स्वामींनी पाहिली. त्यातूनच देशी गाईंचे जतन व संवर्धन करण्याकडे लक्ष पुरविले. देशात देशी गाईंच्या तीस प्रजाती असून त्यापैकी वीस प्रजातींच्या सातशे पन्नास देशी गाई मठात ममत्वतेने जतन केल्या जात आहेत. मठाद्वारे गो परिक्रमा हा उपक्रम राबविला होता. देशी गाईंचे निकोप जतन करणाऱ्यांना एक लाखाचा कामधेनू पुरस्कारही स्वामींनी सुरू केला. मठामध्ये काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या भारत संस्कृती अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काडसिध्देश्वर स्वामींनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे स्वागत करून देशी गाय संवर्धन, एक एकरात एका कुटुंबासाठी शेती उत्पन्न (लखपती शेती), सेंद्रिय शेती हे उपक्रम राज्यपातळीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मठामध्ये याबाबतच्या प्रस्तावांवर अखेरचा हात फिरवला जात आहे.
इतक्यावर न थांबता स्वामींनी हिमाचलापासून ते म्हैसूरपर्यंत देशी गाई पालनाला आर्थिक सक्षमतेचा मूलमंत्र मिळवून दिला आहे. दार्जिलिंग येथील शेरी ही देशी गाई तसेच मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात गीर नावाच्या देशी गाईं नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. स्वामींनी तेथील शेतकऱ्यांची भेट घेऊन देशी गाईचे शास्त्रोक्त पालन कसे करावे, याचे धडे दिले. त्यांनी उत्पादित केलेल्या तुपाला पंधराशे रुपये दर देण्याची तयारी दर्शविल्याने शेतकरी सुखावले गेले. हा गवळी वर्ग आता आनंदाने कणेरी मठाला तुपाचा रतीब घालत आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झाला आहे. म्हैसूरमधील सत्तर देशी गायींचे जतन करणारा चौघांचा गट, हिमोग्यातील आणखी एक गट गायपालनाला रामराम ठोकण्याच्या विचारात असताना महाराजांच्या संदेशामुळे तोही आता सक्षम बनला आहे. बाजारात म्हैस, गाय यांचे दूध ३००-४०० रुपये किलो दराने विकले जात असताना औषधी गुणधर्मामुळे कणेरी मठातील तूप दोन हजार रुपये दराने बाजारात विकले जाते. तुपाची महती पटल्याने मागणी वाढूनही त्याचा पुरवठा करता येत नसल्याची खंत स्वामी व्यक्त करतात.
संग्रहित लेख, दिनांक 7th Nov 2015 रोजी प्रकाशित
कणेरी मठाने दिला गोपालनाला आधार
देशी गाईंच्या तुपाला बाजारपेठ
Written by अपर्णा देगावकर

First published on: 07-11-2015 at 03:45 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaneri math supported to cow cherisher