देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी सज्ज असल्याचा संदेश कोल्हापूरकरांपर्यंत पोहोचविण्यासाठी शनिवारी करवीरनगरी एकता दौडीमध्ये मनापासून धावली. याबरोबरच पोलीस प्रशासन आणि गृहरक्षक दलाच्या वतीने शहराच्या प्रमुख रस्त्यावरून राष्ट्रीय एकतेसाठी संचलन करण्यात आले. तर दसरा चौक येथे राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.
जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कोल्हापूर शहरात एकता दौड झाली. या एकता दौडीचा शुभारंभ दसरा चौकातून जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. तर पोलीस व गृहरक्षक दलाच्या संचलनास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून प्रारंभ करण्यात आला.
दसरा चौकातून सुरुवात झालेल्या एकता दौडीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर रेशमा माने यांच्यासह राष्ट्रीय व राज्य स्पध्रेतील अनेक विजेत्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
या एकता दौडीत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, युवक-युवती, विद्यार्थी-विद्यार्थिनी, स्वयंसेवी संस्था, क्रीडा संस्था, मंडळे यांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग होता. या दौडीमध्ये व्हाईट आर्मी जवानांचा सहभाग लक्षवेधक ठरला. तसेच पोलिसांच्या दिमाखदार संचलनानेही शहरवासीयांच्या नजरा खिळून राहिल्या.
या एकता दौडीच्या माध्यमातून आज कोल्हापुरातील आबालवृध्द रस्त्यावर एकता आणि अखंडतेचा संदेश देत धावले. यामध्ये शालेय विद्यार्थी, तरूण-तरूणी, खेळाडू तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेऊन एकतेचा संदेश समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. िबदू चौक येथे जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2015 रोजी प्रकाशित
एकता दौडीमध्ये करवीरनगरी धावली
देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी सज्ज असल्याचा संदेश कोल्हापूरकरांपर्यंत पोहोचविण्यासाठी शनिवारी करवीरनगरी एकता दौडीमध्ये मनापासून धावली.
Written by बबन मिंडे

First published on: 01-11-2015 at 02:40 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karvir nagari run in ekta daud