छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी कराड तालुक्यातील काले येथील आदर्श दीपक पाटील (वय २२), उंडाळे – शेवाळेवाडीचा श्रीकृष्ण पांडुरंग शेवाळे (वय २२) व त्यांचा मित्र विकास ज्ञानेश्वर वाळके (२२, रा. वाघोली, पुणे) अशा तीन महाविद्यालयीन तरुणांचे अपहरण केल्याचे वृत्त सकाळी येऊन धडकताच एकच खळबळ माजताना, याबाबतच्या अधिक माहितीची उत्कंठा शिगेला पोहोचली. अनेकांनी दूरचित्रवाहिन्यांवरील बातम्यांमध्ये या अपहरण घटनेचा शोध घेणे कायम ठेवले, तर माध्यमांच्या प्रतिनिधींनी आपआपल्या मार्गाने बातमीचा शोध जारी ठेवला. मात्र, अशातच अपहरणकर्त्यांनी या दोघा तरुणांची सुटका केल्याची बातमी येऊन धडकली आणि या साऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. या एकंदर घटनेबाबत लोकांमध्ये आता कुतूहल निर्माण झाले असून, अधिक माहितीची उत्सुकता कायम आहे.
आदर्श पाटील हा पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये इतिहास विषयातून एम. ए. तर श्रीकृष्ण शेवाळे पुणे विद्यापीठात संस्कृत विषयातून एम. ए. करीत आहे. याचबरोबर हे दोघे यूपीएससी व एमपीएससी परीक्षेचा सरावही करीत असून, आदिवासी जीवनाचा अभ्यास हा त्यांचा छंद होता. यातूनच गतवर्षी त्यांनी आदिवासी भागात जाऊन डॉ. बाबा आमटे यांच्या कार्याची पाहणी केली होती. श्रीकृष्ण शेवाळेतर गेल्या १० वर्षांपासून समाजसेवेने भारावून कार्यरत आहे. आदिवासींची दिनचर्या, त्यांचे राहणीमान, समस्या यांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी काही करता येते का? असा या तरुणांचा प्रयत्न असून, याच पाश्र्वभूमीवर भारत जोडो अभियानांतर्गत आदर्श, श्रीकृष्ण, विकास या तिघांनी २४ डिसेंबरला गडचिरोली जिल्ह्यातील आहिरे येथून ओरिसापर्यंत सायकलवरून आदिवासी अभ्यासदौऱ्यास प्रारंभ केला. त्यात ते दररोज आपल्या पालकांशी मोबाईलबरून संपर्क साधत असत. परंतु, २७ डिसेंबरला सायंकाळी उशिरा आदर्शचे आई, वडिलांशी बोलणे झाल्यानंतर मात्र त्याचा मोबाईल बंद झाला. कुटुंबात चिंतेचे वातावरण पसरले. आणि अशातच आज सकाळी आदर्शसह श्रीकृष्ण व विकास वाळके यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याच्या वृत्ताने खळबळ माजली. यावर कुटुंबीय व तरुणांनी पुण्याकडे धाव घेऊन वृत्ताची वस्तुस्थिती जाणून घेताना, या तिघांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. त्यात सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील, काले येथील पत्रकार संभाजी थोरात व फलटणचे नगरसेवक अनुप शहा यांनी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका घेतली. संभाजी थोरात यांनी अपहरण झालेल्या घटनास्थळाजवळील पोलीस ठाण्यांचे फोन नंबर्स मिळवून तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क निर्माण केला. सारंग पाटील यांनीही वरिष्ठस्तरावरून माहिती मिळवताना, पाटील व शेवाळे कुटुंबाला धीर दिला. दरम्यान, दुपारच्या सुमारास सुकमा जिल्ह्यातील चप्पलनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिन्ही तरुणांची नक्षलवाद्यांनी सुटका केली. यानंतर आदर्शशी फोनवरून बोलणे झाल्याचे त्याचे काका सुनील मोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidnapping news excitement curiosity
First published on: 04-01-2016 at 01:56 IST