डॉक्टरांवरील हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सूचना

राज्यभरात डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) पोलीस दलाकडून २४ तास पुरेशी सुरक्षा व्यवस्था तनात करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी  दिले.

याच बठकीत मंत्री पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सीपीआर रुग्णालयाच्या आवारातील अतिक्रमण काढताना राजकीय दबाव झुगारुन रविवार (२ एप्रिल) पर्यंत थेट कारवाई करा अन्यथा सीपीआर प्रशासनावर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच शासकीय सेवेत राहूनही बाहेर दवाखाने सुरु करणाऱ्या डॉक्टरांची यादी तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचे सांगत पालकमंत्री पाटील यांनी त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सोमवारी दुपारी सीपीआर रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाची बठक अधिष्ठाता कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी त्यांनी सीपीआर मधील विविध कामांचा आढावा घेतला. भाजलेल्या रुग्णांसाठी अद्ययावत कक्ष उभा करणे, नवीन पोलीस चौकीची उभारणी करणे, सांडपाणी निर्गतीकरणाचा प्रश्न, या गोष्टी प्रामुख्याने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

राजकीय दबाव झुगारुन अतिक्रमण काढा   

सीपीआर रुग्णालयाच्या आवारात १४ अतिक्रमणं आहेत. या अतिक्रमण धारकांना १ एप्रिलपर्यंतची मुदत देऊन मंगळवारी अंतिम नोटीस द्या अशा सूचना मंत्री पाटील यांनी केल्या. या वेळी अतिक्रमण काढताना कोणताही राजकीय दबाव घेऊ नका. २ एप्रिलपर्यंत सीपीआरचे आवार अतिक़्रमणमुक्त झाले पाहिजे अन्यथा सीपीआर प्रशासनावर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत पालकमंत्री पाटील यांनी दिले.

पोलीस बंदोबस्ताचे पसे देण्याचे त्यांनी मान्य केले  

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीपीआर रुग्णालयातही डॉक्टरांना सुरक्षा पुरविली जाणार आहे. तसेच रुग्णांसोबत दोनच नातेवाइकांना आत थांबण्याची परवानगी देण्यात येईल, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. नातेवाइकांना भेटण्यासाठी एक विशिष्ट वेळ ठरवून पास सिस्टीम सुरु करण्याच्या सूचनाही बठकीत देण्यात आल्या. त्याचसोबत डॉक्टरांना पुरेसा पोलीस बंदोबस्त २४ तास देण्यात यावा अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली. यावर पाटील यांनी पोलीस उपाअधीक्षक भारतकुमार राणे यांना डॉक्टरांना पुरेसा पोलीस बंदोबस्त द्यावा, त्यांचे पसे शासन भरेल असे सांगितले.