कराडजवळील किल्ले वसंतगडच्या पूर्वेस जामकर वस्ती- पिंपळाचं परडे येथे सुमारे ५ वर्षांचा नर जातीचा बिबटय़ा सडलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. या बिबटय़ाच्या पायाचे पंजे, जबडा व अन्य अवयव तोडून, कापून नेल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकाराबाबत उलटसुलट चर्चा आहे. बिबटय़ाचे शवविच्छेदन झाले असून, त्याचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
बिबटय़ाची जोडी व दोन पिलांचा या परिसरात वावर असल्याचे स्पष्ट होऊनही याबाबत वनखाते गंभीर नसल्याची बाब समोर येत आहे. बिबटय़ाचा मृत्यू होऊन त्याचे शरीर सडल्याचा प्रकार घडूनही वन खाते अंधळय़ाच्या भूमिकेत राहिल्याने या प्रकाराबाबत अनेक तर्कवितर्क उपस्थित होत आहेत. आता बिबटय़ाच्या मृत्यू आणि त्याच्या अवयवांची झालेली चोरी याची नेमकी वस्तुस्थिती वन खात्याच्या सखोल चौकशीनंतरच समोर येणार आहे. पण, या घटनेवर वनखाते गंभीर किती? हा कळीचा प्रश्न आहे. मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे व निसर्गप्रेमी कार्यकर्ते नाना खामकर यांचे समक्ष वनक्षेत्रपालांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. त्यात बिबटय़ाचे दात, पंजे, मिशा, शेपूट, हाडे गायब झाल्याची माहिती समोर आली असली तरी त्याची कातडी मात्र जागीच होती. त्यामुळे बिबटय़ाची कोणी हत्या केली असेल तर ते सराईत शिकारी नसावेत असा अंदाज बांधला जात आहे.
सडलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या बिबटय़ाचा मृत्यू तीन आठवडे ते एक महिन्यापूर्वी झाला आहे. ज्या ठिकाणी मृत बिबटय़ा आढळून आला ते पंचक्रोशीतील मृत जनावरे टाकून देण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे एखाद्या मृत जनावराचे मांस खाल्ल्याने विषबाधा होऊन या बिबटय़ाचा मृत्यू झाल्याचा अंदाज बांधला जात असला तरी या बिबटय़ाची मादी व दोन पिल्ले असे मांस खावून येथेच विषबाधेने त्यांचाही मृत्यू का ओढावला नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. प्रथमदर्शनी बिबटय़ाचा मृत्यू कशाने झाला याचे उत्तर नसले तरी बिबटय़ाच्या अवयवांची चोरी मात्र जाणीवपूर्वक झाल्याचे स्पष्ट होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2015 रोजी प्रकाशित
कराडजवळ बिबटय़ाचा संशयास्पद मृत्यू
कराडजवळील किल्ले वसंतगडच्या पूर्वेस जामकर वस्ती- पिंपळाचं परडे येथे सुमारे ५ वर्षांचा नर जातीचा बिबटय़ा सडलेल्या अवस्थेत मिळून आला आहे.
Written by दया ठोंबरे

First published on: 24-11-2015 at 01:32 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard suspect death