कोल्हापूर : मटण दर किती यावरून गेला पंधरवडाभर सुरू असलेला चर्चेचा खिमा अखेर मंगळवारी सामोपचाराने संपला. मटण प्रति किलो ४८० रुपये दराने विक्री करण्यावर एकमत झाल्याने कोल्हापूरकरांचा जीव भांडय़ात पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापुरात मटण दरवाढीवरून झणझणीत वादाची फोडणी पडली होती. ४५० रुपये किलोच्या घरात असणारा दर प्रतिकिलो ६०० रुपये झाला. लगेचच पेठापेठात विरोधाचे नारे सुरू झाले. खाद्यप्रेमी आणि विक्रेते आपल्याच म्हणण्यावर ठाम राहिले.

विषय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या दरबारात गेला. कृती समितीने थेट  २८० रुपये किलो दराने मिश्र मटण (चरबीसह) व विनामिश्र मटण ४५० रुपये किलोने विक्री व्हावी, अशी मागणी केली.

मटण विक्रेत्यांनी प्रतिकिलो ५६० रुपयांऐवजी ५४० रुपयाने विक्री करू, अशी तयारी दर्शवली. त्यावर देसाई यांनी बारा सदस्यीय समिती स्थापन केली.

इकडे, चर्चेच्या खमंग फेऱ्या सुरूच राहिल्या. आज या आंदोलनाची गोड सांगता झाली. शिवाजी पेठ येथे झालेल्या बैठकीत मटण दर ४८० रुपये किलो दराने विक्री करण्यास विक्रेत्यांनी मान्यता दिली. त्यावर खाटिक समाजील अध्यक्षांना पेढा भरवून मंडळी मोठय़ा कोडय़ातून सुटका झाल्याच्या आनंदात बाहेर पडली.

चर्चेत  देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश, सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने आर. के. पोवार, सुजित चव्हाण, दुर्गेश लिंग्रस, अजित राऊ त, चंद्रकांत यादव, बाबा इंदुलकर, सुरेश जरग तसेच खाटिक समाजाचे अध्यक्ष विजय कांबळे, सर्व मटण विक्रेते, उपस्थित होते. ‘कोल्हापूरकरांना एक चांगला दिलासा मिळाला,’ अशा स्वागताच्या चवदार प्रतिक्रीया समाज माध्यमात उमटल्या.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mutton price rs 480 per kg in kolhapur zws
First published on: 11-12-2019 at 01:00 IST