दुष्काळाची परिस्थिती समोर असताना आता शेतकऱ्यांना मोठी आव्हाने पेलावी लागणार आहेत. ही आव्हाने पेलण्यासाठी आता त्यांना नव्या माहितीचा प्रसार आणि प्रचार करावा लागणार आहे. असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. तर कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन चांगली माहिती मिळणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार  महादेवराव महाडिक यांनी केले.
येथील मेरीवेदर ग्राऊंड आयोजित भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी आणि कोल्हापूर जिल्हय़ातील आसपासच्या गावातील हजारो नागरिकांनी लाभ घेतला. प्रदर्शनामध्ये बिनविरोध झालेल्या ३६ ग्रामपंचायतींना १० लाखांचा निधी व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
खा. धनंजय महाडिक यांनी स्वागत केले. महाडिक यांनी आधुनिक शेतीसाठी कोणकोणते तंत्रज्ञान वापरले पाहिजे याची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार असल्याचे सांगून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत इंजिनियरिंगचे शिक्षण आमच्या इंजिनियिरग कॉलेजमधून दिले जाईल. त्यांचा सर्वच्या सर्व खर्च आम्हीच उचलणार असल्याचे जाहीर केले.
माजी आ.महादेवराव महाडिक यांनी दुष्काळाची परिस्थिती असली तरी आमचा गोकुळ संघ हा चांगली सेवा देत राहील असा विश्वास व्यत्त केला आहे. िठबक सिंचनाची गरज आहे. यासाठी सबसिडीमध्ये वाढ होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार हसन मुश्रीफ यांनी चांगल्या पिकांची पदास कशी करायची, शेतकऱ्यांनी कशी शेती करायची याचे ज्ञान या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी मनोगत व्यत्त केले.