कोल्हापूर : आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठवणे आणि जातनिहाय जनगणना करणे यासाठी इंडिया आघाडी, काँग्रेस कटिबद्ध आहे. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप कितीही विरोध करू देत. परंतु, आम्ही हे काम संसदेत केल्याशिवाय राहणार नाही, असा इरादा लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते राहुल गांधी यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. येथे संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेल सयाजी येथे झालेल्या या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी राहुल गांधी बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज छत्रपती होते.

यावेळी राहुल गांधी यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारधारेवर हल्लाबोल करतानाच संविधानाचे रक्षण करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, देशातील प्रमुख सत्तास्थानी संघ विचारधारेचे लोक बसले आहेत. ते बहुसंख्यांकांची अडवणूक करत आहेत. ९० टक्के सामान्यांच्या प्रगतीचे दरवाजे या लोकांनी बंद केले आहेत. एकीकडे देशात २४ तास प्रगती होत असल्याची चर्चा घडवली जाते. परंतु, दुसरीकडे सामान्यांच्या हिताला खीळ घालण्याचे काम या प्रवृत्तीने केले आहे. अग्निवीर सारख्या सामान्यांना संधी असणाऱ्या योजनेतून निवृत्ती वेतनसह अन्य लाभ हिसकावण्याचा प्रयत्न या प्रवृत्तीने केला आहे.

हेही वाचा – राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

या प्रवृत्तीने संविधान धोक्यात आणले आहे. ते वाचवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होण्याची गरज व्यक्त करून राहुल गांधी यांनी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठवणे आणि जातनिहाय जनगणना करण्याचा कार्यक्रम उपयुक्त कसा ठरू शकतो याचे विवेचन केले. ते म्हणाले, देशांमध्ये मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, आदिवासी यांचा वाटा ९० टक्के असताना अर्थसंकल्पात या वर्गासाठी अत्यल्प तरतूद केलेली असते. ही कृत्रिम मर्यादा हटवणे हे आमचे उद्दिष्ट असणार आहे.

देशात कोणत्या समाजाची संख्या किती आहे हे अधिकृतरित्या किती आहे हे कोणालाच माहिती नाही. यासाठी जातनिहाय जनगणनेचा एक्स-रे निघायलाच हवा. यातून या उपेक्षित समाजाचे विच्छेदन होऊन त्यावर उपाययोजना करता येणे शक्य होणार आहे. परंतु संघप्रवृत्तीचे लोक यापासून जाणीवपूर्वक दूर जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – “शिवाजी महाराजांचा विचार म्हणजेच संविधान, पण या संविधानाला…”; कोल्हापुरातील सभेतून राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल!

देशाचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न संघ प्रवृत्तीकडून होत आहे, असा आरोप करून राहुल गांधी म्हणाले, आज मर्यादित लोक सत्ता चालवत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारधारेचा प्रभाव शिक्षण, उद्योग, अर्थकारण, वरिष्ठ पदावरील नोकऱ्या अशा सर्वच घटकांवर दिसत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महात्मा गांधी यांच्या चर्चा होऊन संविधान आकाराला आले. त्यावर घाला घालण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. डॉ. आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश समाजाला दिला आहे. हा विचार डोळ्यासमोर ठेवून आजूबाजूला जे काही घडत आहे त्याकडे डोळसपणे पाहून संघर्षासाठी कटिबद्ध होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी खासदार राहुल गांधी यांचा विठ्ठल रुक्मिणी देवीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. याचे मूर्तिकार स्वप्निल कुंभार यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. कार्यक्रम संपल्यावर त्याच्याशी संवाद साधून त्यांनी कौतुक केले.