ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पन्हाळगडाचे ढासळते दुर्गवैभव थांबण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. शिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगडाच्या तटबंदीची पडझड सुरू आहे. पुरातत्त्व विभागाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास पन्हाळगडाची दुरवस्था आणखी वाढीस लागणार आहे.  भारतीय पुरातत्त्व विभागाने गेल्या काही वर्षांपूर्वी ऐतिहासिक स्थळांची दुरुस्ती करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी पन्हाळय़ाला दिला होता. तीन दरवाजा, अंधारबाव, धान्यकोठार, कलावंतीण महल ऊर्फ नायकिणीचा सज्जा आदी ठिकाणी पडझड झाली होती. याची दुरुस्ती या निधीतून होऊन जुन्या इमारतींना नवलाईचे बळ आले. तथापि, अन्य आवश्यक ठिकाणी निधी खर्च करणे गरजेचे होते, पण त्या ठिकाणी तो खर्च झालाच नाही. तत्कालीन अधिकाऱ्यांनी नको त्या तटबंदीची डागडुजी केली. पडझड सुरू असलेल्या तटबंदीच्या ठिकाणी निधी खर्च केला नाही. सिद्दी जोहारच्या वेढय़ातून शिवाजीमहाराज राजिदडी मार्गाने विशाळगडाला मार्गस्थ झाले. त्याच राजिदडी मार्गावरील तटबंदीची गेल्या वर्षांपासून पडझड सुरू आहे. गेल्या वर्षी तर ही तटबंदी ढासळून राजिदडी मार्गच बंद झाला आहे. एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाने उत्तर भागातील ऐतिहासिक टेहळणी बुरुजावर जुने दगडी बांधकाम पाडून त्या ठिकाणी विनापरवाना फरश्या बसवल्या आहेत. हे काम एवढय़ावरच न थांबता बुरुजाच्या खालील बाजूस हॉटेलचे सर्व सांडपाणी तटबंदीवरच सोडल्याने बुरुजाखालील असलेल्या तबक उद्यान येथील तटबंदी ढासळली आहे. तरीही पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यंना लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. आकाशवाणी टॉवर परिसरातील नागफणी ऊर्फ मुंढा दरवाजाच्या शेजारील तटबंदीचे बांधकाम कमकुवत झाल्याने त्या तटबंदीचे दगड निखळू लागले आहेत. त्याचबरोबर सज्जा कोठीपासून ते चार दरवाजा या दोन किमी अंतरातील तटबंदीचे बांधकाम कमकुवत झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केल्याने पन्हाळय़ाच्या तटबंदीचे अस्तित्व धोक्यात आले असून, अशा तटबंदीची दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख मारुती माने, माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, माजी नगराध्यक्षा वीणा बांदिवडेकर, नगरसेविका माधवी भोसले यांच्यासह  इतिहासप्रेमी, शिवप्रेमी तसेच पन्हाळय़ाच्या नागरिकांतून होत आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने ज्या प्रमाणे रायगडच्या संवर्धनासाठी निधी दिला आहे, त्याचप्रमाणे पन्हाळय़ालाही निधी मिळावा व तटबंदीची डागडुजी व्हावी अशी मागणी होत आहे. पन्हाळा विभागासाठी पुरातत्त्व खात्याने एकाच अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. या अधिकाऱ्याकडे पुन्हा अन्य तीन स्थळांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने पन्हाळगडासाठी त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही हीदेखील इथली मोठी अडचण आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panhala fort wall collapse
First published on: 22-08-2017 at 02:54 IST