पावसाळा सुरू झाल्यापासून दडी मारलेल्या पावसाने महिन्यानंतर जिल्ह्याला बुधवारी न्हाऊ घातले. आज सर्वत्र पावसाचे दमदार आगमन झाले असून धरणक्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याचे वृत्त आहे. निराश झालेला शेतकरी काहीसा आनंदी झाला असून पाणीटंचाईच्या भीतीने ग्रासलेल्या प्रशासनाने सुटकेचा सुस्कारा सोडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा पावसाने भलतीच ओढ दिली आहे. शेतकरी पावसाची वाट आतुरतेने पहात होता. पण प्रत्येक वेळी पावसाने हुलकावणी दिली. सतत ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल असे वाटायचे पण पाऊस दगा देत राहिला. पावसाचे आगमन लांबल्याने वातावरणात उष्मा निर्माण झाला होता. शहरात पावसाने जूनच्या पहिल्या आठवडय़ातच आगमन केले होते. या पावसाने करवीरकर सुखावले असतानाच पुन्हा पावसाने पाठ फिरवली.

पाऊस लांबल्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य तीव्र पाणीटंचाईच्या भीतीने नागरिक चिंतेत होते. हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी मंगळवापर्यंत पाऊस दाखल होण्याचे जाहीर केले होते. अखेर  ३ आठवडय़ांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आज पुन्हा हजेरी लावली. सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाची मंद गतीने रिपरिप सुरू राहिल्याने नागरिक सुखावले आहेत.

पावसाचे आगमन झाले असले तरी अद्यापही पेरणीयोग्य पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले असताना पहाटे पावसाचे आगमन झाले. आता पावसाने दीर्घ मुक्काम टाकावा अशी अपेक्षा केली जात आहे.

 

 

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainfall in kolhapur
First published on: 30-06-2016 at 02:11 IST