स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील मैत्रीचा पोपट अजूनही जिवंत आहे, अशा शब्दांत खा. राजू शेट्टी यांनी त्यांचे निकटचे सहकारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी संघटनेशी अद्यापही नाळ जोडली असल्याचे स्पष्ट केले. याच वेळी त्यांनी सदाभाऊचे सुपुत्र सागर यांच्या भाजप प्रवेशाचा संदर्भ देत, भाजपला मित्र पक्ष आपल्याकडे ओढून घेण्याची सवय आहे, असा चिमटा काढला. एखाद्याच्या जवळ गेल्यावरच त्याचे गुण – दोष कळू लागतात, अशी टिपणी करत भाजपवर हल्ला चढवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या आत्मक्लेश यात्रेच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, या यात्रेतून शेतकऱ्यांमध्ये लढण्याचे आत्मबळ निर्माण होईल. नऊ दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये शेतकऱ्यांबरोबरच कलावंत, कवी, विचारवंत, पत्रकार हे देखील सहभागी होणार आहेत.  आपला राजकीय मैत्रीचा प्रवास भाजपकडून शिवसेनेकडे सुरु आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले,  शेती व शेतकरी याविषयी माझा अभ्यास आहे. शिवसेनेला असे वाटले, की माझ्याकडची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांना समजावी यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी निमंत्रित केले होते. यामध्ये काहीही चुकीचे नाही. शेतकरी प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही बोलावले तरी तेथे जाण्याची आपली तयारी आहे. फक्त अट एकच राहील की तेथे काय बोलायचे याचा पूर्णत निर्णय माझा असेल, असे म्हणत त्यांनी प्रसंगी कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या शेतकरी विषयक मंचावर जायची तयारी आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा अस्थीकलश घेऊन जाणाऱ्या विजय जाधव या शेतकऱ्याला, तो वेडा असल्याची संभावना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली होती. यावर टिप्पणी करताना शेट्टी यांनी, वेडेच क्रांती करतात, हे त्यांनी विसरू नये, असा टोला लगावला .

सदाभाऊ यांना चिमटा

आपले विधिमंडळातील संख्याबळ कमी असल्याने मध्यावधी निवडणुका होण्याबाबत अधिकारवाणीने बोलू शकत नाही, अशा शब्दांत आपल्या मर्यादा शेट्टी यांनी स्पष्ट केल्या. पण स्वभिमानीचा एक मंत्री राज्याच्या सत्तेत आहे , याकडे लक्ष वेधले असता राज्यमंत्र्याच्या मर्यादा सीमित आहेत. त्यांना मंत्रीमंडळाच्या बठकीलाही उपस्थित राहता येत नाही, असा उल्लेख  करत खोत यांचे स्थान नगण्य असल्याचे स्पष्ट करीत सदाभाऊ यांना चिमटा काढण्यास ते विसरले नाहीत .

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetti and sadabhau khot issue swabhimani shetkari sanghatana
First published on: 24-05-2017 at 02:19 IST