कोल्हापूर : इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक गेल्या २ वर्षांपासून आर्थिक संकटात सापडल्याने रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. बँकेचे खातेदार, ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. बँकेचे संस्थापक कै. शंकरराव पुजारी यांनी गोरगरिबांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने नूतन बँकेची स्थापना केली होती. ते हयात असेपर्यंत बँकेवर त्यांचा वचक होता. मात्र त्यांच्या पश्चात बँकेची सूत्रे पुत्र प्रकाश पुजारी यांच्याकडे आल्यावर आर्थिक घडी विस्कटली. गेल्या २ वर्षांत तर आर्थिक संकटामुळे ठेवीदार ठेवी काढण्यासाठी बँकेत गोंधळ घालताना दिसत होते.

आता रिझव्‍‌र्ह बँकेने ६ महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. बँकेची सध्याची तरलतेची स्थिती लक्षात घेता सर्व बचत, चालू खाती किंवा ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतून रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. परंतु अटींची पूर्तता करून ठेवींवर कर्ज काढण्याची परवानगी आहे. बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांनी बँक सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न करूनही अपयश आले. रिझव्‍‌र्ह बँकेने काही प्रमाणात निर्बंध लादले असले तरी बँक सुस्थितीत येण्याची आशा व्यक्त केली.