कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात बुधवारी अटक करण्यात आलेला समीर गायकवाड निर्दोष असल्याचा दावा सनातन संस्थेने केला आहे. समीर गायकवाड आमचा साधक असून त्याच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. त्याला पानसरे हत्या प्रकरणात विनाकारण गोवण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण सनातन संस्थेकडून देण्यात आले आहे. समीर गायकवाड हा गणपतीनिमित्त दोन दिवस घरी आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली. समीर गायकवाडसह त्याचे संपूर्ण कुटुंब आमचे साधक आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या कायदेशीर मदतीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सनातन संस्थेला रोखण्याचे काम याआधीही झाले आहे. दाभोलकर हत्याप्रकरणातही सनातनवर आरोप झाले, पण काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे समीर निर्दोष सुटेल असा विश्वास आहे, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते संदीप शिंदे यांनी सांगितले.