कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातापदाचा पोरखेळ अजूनही सुरूच आहे. डॉ. प्रकाश गुरव यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग चिकित्साशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. एस. एस. मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात अधिष्ठातापदी नियुक्त झालेल्या डॉ. सुनीता रामानंद यांची अवघ्या २४ तासांच्या आत सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली होती. डॉ. रामानंद यांच्या जागी डॉ. प्रकाश गुरव यांची अधिष्ठाता पदावर नियुक्ती झाली होती. कोल्हापूरच्या अधिष्ठातापदाचा पोरखेळ पुढे सुरू राहत आता डॉ. मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा – शिवसेनेच्या महाअधिवेशनास उत्साही वातावरणात सुरुवात; सहा ठराव संमत
कोल्हापूरमधील सीपीआर शासकीय रुग्णालयास न्यूटन कंपनीने बनावट नोंदणी पत्राच्या आधारे साहित्य पुरवठा केला होता. यावरून ठाकरेसेनेने दोन दिवसापूर्वी तीव्र आंदोलन केले होते. यानंतर डॉ. गुरव यांनी याबाबत पोलिसात फिर्याद देण्याचे आश्वासन दिले होते. तथापि त्यांनी सही न करता पोलीस ठाण्यामध्ये पत्र दिले होते. त्यानंतर ते रजेवर गेले होते. पुढे तीन दिवसातच डॉ. गुरव यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. त्यांच्या जागी डॉ. मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.