कोल्हापूर महापालिका निवडणूक येत्या रविवारी होणार असून प्रचारासाठी आजचा एकमेव रविवार सुटीचा लाभ उठवत सर्व पक्ष तसेच उमेदवारांनी अवघे शहर प्रचारासाठी िपजून काढले. मतदानाचे आवाहन करण्यासाठी वाजत-गाजत येणाऱ्या मिरवणुका आणि थेट दारी पोहोचणारे प्रचारक यांच्यामुळे मतदारांचे मात्र सुटीचे खोबरे झाले. येणाऱ्या प्रत्येक उमेदवार व त्याच्या समर्थकांना तोंड देखले मतदान करु, असे सांगत सुटीपासून मुकलेल्या मतदारांनी त्यांची बोळवण केली.
महापालिकेतील ८१ प्रभागांमध्ये निवडणूक होत आहे. सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-ताराराणी आघाडी, शिवसेना या प्रमुख पक्षांसह काही प्रमाणात डावे पक्ष, अपक्ष यांनी निवडणूक आखाडय़ात उडी घेतली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराला मागे टाकून आपली प्रतिमा अधिक उजळण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरु आहे. मात्र प्रत्यक्ष मतदारांना भेटून आपली भूमिका पटविणे उमेदवारांना गरजेचे वाटत आहे. त्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी रविवारच्या सुटीचा चांगलाच वापर करुन घेतला.
सकाळपासूनच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी वाजत-गाजत प्रचार मिरवणुका काढल्या. ध्वनिक्षेपकावरुन लक्षवेधी घोषणांचा पाऊस पाडत मतदारांना आकर्षति करण्यात आले. अनेकांनी मतदारांच्या उंबरठय़ावर जाऊन मतदानाची याचना केली. त्याचबरोबर मतदारांना आकर्षति करण्यासाठी त्यांच्या विशेष खान-पानकडेही लक्ष पुरविण्यात आले. यामुळे सायंकाळनंतर शहरातील हॉटेल तसेच शहराबाहेरील धाबे, रिसॉर्ट येथे जंगी मेजवानी झोडली जात होती. तर, हळदी कुंकवाच्या निमित्ताने कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.
दिवसभर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहराज्यमंत्री राम िशदे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराने राजकीय वातावरण चांगलेच तापले. याशिवाय, कोपरा सभा, घरगुती बठका यांनाही जोर चढला होता. एकूणच रविवारच्या सुटीला प्रचाराची किनार लाभली होती.