विनोद तावडे यांची शरद पवारांवर टीका

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेवरील निवडीवर शरद पवार यांनी मळमळ व्यक्त केल्यावर आता त्यांचे पडसाद उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला संयतपणे प्रत्युत्तर दिले असले तरी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मात्र पवारांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत त्यांच्या ‘जाणता राजा’ या वापरल्या जाणाऱ्या उल्लेखावर प्रश्नचिन्ह उभे  केले.

संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेवरील निवडीवर पवार यांनी शनिवारी भाष्य करताना इतिहासाचा दाखला देत फडणवीस यांच्याकडून राजा निवडण्याचा प्रकार घडल्याच्या आशयाचे विधान केले.

राष्ट्रपतींकडून झालेल्या निवडीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि खुद्द संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या कुचेष्टेवर येथे टीका होऊ लागली. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना संयत भाषेत उत्तर दिले. मात्र अन्य एका कार्यक्रमासाठी आलेल्या तावडे यांनी या पाश्र्वभूमीवर पवारांनी स्वत:ला लावून घेतलेल्या ‘जाणता राजा’ या शब्दावर आक्षेप घेत हल्ला चढवला.

तावडे म्हणाले, पवार खरेतर कोल्हापुरातील राजवाडय़ावर गेले होते. तिथे त्यांनी पाहुणचारही घेतला होता. या वेळी त्यांच्या निवडीची खरी परिस्थिती समजून घेतली असती, तर त्यांना या गोष्टींचा खुलासा झाला असता. खरेतर त्यांची निवड झाली ही आनंदाची गोष्ट असताना त्यावर शिंतोडे उडवण्याचा हा प्रकार आहे.

छत्रपती शिवरायांच्या वेळीही त्यांचे बरे झाल्याचे जावळीचे मोरे, डफळे, बारामतीजवळील सुप्याचे मोहिते यांना कधीच पाहवले नव्हते. त्याचीच पुनरावृत्ती इथे होतआहे. समजून न घेता विधाने केली जात असतील तर यांना ‘जाणता राजा’ कसे म्हणायचे, असा सवाल तावडे यांनी उपस्थित केला.