खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढ संदर्भात इचलकरंजी प्रांताधिकारी यांनी बोलविलेली सलग तिसरी बठक गुरुवारी निष्फळच ठरली. ट्रेडिंगधारकांच्या आडमुठय़ा धोरणामुळे यंत्रमागधारक व ट्रेडिंगधारक यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाली. अखेर १९ मार्च रोजी पुन्हा संयुक्त बठक घेण्याचा निर्णय प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी जाहीर केला. या वेळी खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची गर्दी झाली होती. पण आजही निर्णय न झाल्याने संताप व्यक्त होत होता.
गत तीन वर्षांपासून खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना मजुरीवाढ मिळालेली नाही. या संदर्भात इचलकरंजी क्लॉथ अॅण्ड यार्न र्मचट्सच्या असोशिएशनशी पॉवरलूम असोशिएशनच्या माध्यमातून पत्रव्यवहारही झाला. पण ट्रेडिंगधारकांकडून कोणतीच दाद मिळाली नाही. त्यामुळे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी मोर्चा काढून प्रांताधिकाऱ्यांनीच मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार यापूर्वी दोन संयुक्त बठका झाल्या. पण त्यामध्ये निर्णय होऊ शकला नव्हता. त्यामुळे गुरुवारी पुन्हा बठक बोलविण्यात आली होती. ट्रेडिंगधारकांच्या वतीने उगमचंद गांधी, घनश्याम इनानी, विनोद कांकाणी, तर खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या वतीने सतीश कोष्टी, जीवन बरगे, धर्मराज जाधव, संजय सातपुते, कॉ. सदा मलाबादे आदी उपस्थित होते.
ट्रेडिंगधारकांनी वस्त्रोद्योग व्यवसायात सध्या असलेल्या मंदीचे कारण पुढे करत मजुरीवाढ देणे अशक्य आहे. तसेच असोशिएशनच्या सर्व सदस्यांबरोबर झालेल्या चच्रेत मजुरीवाढ देण्यास असमर्थता दर्शविली असल्याचे सांगितले. तर खर्चीवाल्यांच्या प्रतिनिधींनी प्रचलित दरानुसार ही वाढ मिळावी अशी मागणी केली. मात्र ट्रेडिंगधारकांनी एक महिन्याचा कालावधी द्यावा असे सांगितले. यावरून ट्रेडिंगधारक व खर्चीवाले प्रतिनिधी यांच्यात शाब्दिक वाद होऊन खडाजंगी उडाली. येत्या आठ दिवसांत या संदर्भात निर्णय घ्यावा, असा आग्रह खर्चीवाल्यांनी धरला. अखेर या संदर्भात १९ मार्च रोजी पुन्हा बठक घेण्याचा निर्णय होऊन बठक संपली.