माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सनातन संस्था बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचे संस्थेचे संजीव कुन्हाळकर आणि हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत सांगितले. चुकीचे वृत्त प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपी रुद्र पाटील आमच्या संपर्कात नाही. तो आमच्या संपर्कात आला, तर त्याला पोलीसांना शरण जाण्यास सांगू, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, प्रवरा येथील विखे-पाटलांच्या कारखान्याने वीजनिर्मितीचे दोन हजार कोटी बुडवले असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. सध्या राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपोळतोय. त्यामुळे विखे-पाटलांनी पैसे परत करावेत, यासाठी आम्ही न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहोत. पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशियत आरोपी समीर गायकवाड सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता नव्हता. त्याला संस्थेकडून कोणताही मोबाईल देण्यात आलेला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर आम्ही आरोपींना कोणतेही निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिलेले नाही. आम्हाला ते निरपराध वाटतात, असेच आम्ही सांगितलेले आहे, असे इचलकरंजीकर यांनी सांगितले. पानसरे हत्येचा सनातन संस्थेशी कसलाही संबंध नाही, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
माजी पोलीस अधिकारी समशुद्दीन मुश्रीफ हे कायम सनातन संस्था आणि हिंदूविरोधात द्वेष भावनेने बोलतात. बुद्धिभेद करण्याचे काम ते करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधातही न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.