यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी स्वीकारले आहे. प्रदर्शनाचे प्रमुख मार्गदर्शक व माजी सहकारमंत्री विलासकाका उंडाळकर यांच्या सूचनेनुसार यंदा शेतकऱ्याला पूर्णपणे केंद्रस्थानी ठेवून होणाऱ्या भव्य प्रदर्शनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या शेतकऱ्यांची यशोगाथा अनुभवता येणार आहे. कृषीपूरक उत्पादन, शेतकरी गट व महिला बचतगटांसाठी ४०० पैकी १०० दालने विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण व महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे दरवर्षीप्रमाणे २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान, आयोजित यंदाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन २५ नोव्हेंबर रोजी प्रथेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. या वेळी राज्याचे कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे, सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष नामदार शेखर चरेगावकर, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, ग्रामविकासमंत्री पंकजा पालवे-मुंढे, कृषी व गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रदर्शनाच्या संयोजकांनी दिली.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीतर्फे भरवण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे हे १२ वे वर्ष असून, सलग चौथ्यावर्षी मे. शुअरशॉट इव्हेंट मॅनेंजमेंट कंपनीतर्फे प्रदर्शनाचे हायटेक नियोजन करण्यात येते. त्यांच्याकडून गत तीन प्रदर्शनामध्ये यांत्रिक शेती व कमी पाण्यावरील शेती या संकल्पनेवर भर देऊन प्रदर्शन लक्षवेधी ठरवण्यात आले होते. यंदा प्रदर्शनाची उंची राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा संयोजकांचा निर्धार आहे. यंदाच्या प्रदर्शनातील ७० टक्के दालनांचे आरक्षण झाले असून, त्यात रिलायन्स फाउंडेशनचे सर्वात मोठे दालन असून, मेक इन महाराष्ट्र व जलयुक्त शिवार हे राज्य शासनाचे दोन महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रदर्शनातील खास आकर्षण ठरेल. यंदा विक्रमी १० लाखांवर प्रेक्षकांची निश्चित उपस्थिती राहिल असा विश्वास शुअरशॉट इव्हेंट मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक संदीप गिड्डे यांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wetter suburbs make in maharashtra yashwant agricultural exhibition
First published on: 03-11-2015 at 03:34 IST