अविष्कार देशमुख, नागपूर 

नागपूर

मुलांमध्ये व्यायामाची गोडी निर्माण व्हावी, केवळ या उद्देशाने महालच्या मुख्य संघ इमारतीच्या शेजारी (जुने नागपूर) नागपूर व्यायामशाळेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९१८मध्ये करण्यात आली. त्या काळात व्यायामाचे महत्त्व आणि शिक्षण देणारी संस्था नसल्यामुळे दिवंगत अण्णासाहेब खोत, डॉ. ल.वा. परांजपे, दत्तोपंत मारुळकर आदी सहा जणांनी मिळून या व्यायामशाळेची स्थापन केली. मुलांनी देशात व्यायामशाळेचे किंवा शहराचे नाव मोठे करावे, हा स्थापनेमागचा उद्देश कधीच नव्हता, तर मुलांचे आरोग्य आणि सुदृढता कायम राहावी, हा प्रामाणिक हेतू होता. नागपुरातील सर्वसामान्य व्यक्तीच नव्हे, तर पहिले सरसंघचालकसुद्धा या व्यायामशाळेचे विद्यार्थी असून हा शतकमहोत्सवी व्यायामवारसा त्यांनी दिमाखात जपला आहे.

शहरात व्यायामशाळा सुरू करण्याच्या निर्णयानंतर १९१८मध्ये खोत, मारुळकर, डॉ. परांजपे यांनी पैसे गोळा करून केवळ ६०० रुपयांत सात हजार पाचशे चौरस मीटर जागा खोतांच्या नावे खरेदी केली आणि तिथे कौलारू नागपूर व्यायामशाळेची स्थापना केली. या परिसरातील मुलांनी सुदृढ आयुष्य जगावे, याकरिता नाममात्र दरात येथे प्रवेशिका देण्यात आल्या. व्यायामशाळेत कुस्तीपटूंसाठी १५ बाय १५ फुटांचा १० फूट खोल लाल मातीचा गोदा तयार करण्यात आला. साहित्य आणण्यात आले आणि व्यामशाळेला सुरुवात झाली. सकाळी सहा ते दहा आणि दुपारी साडेपाच ते रात्री साडेनऊपर्यंत शाळा सुरू असते. शंभर वर्षे जुने व्यायामाचे साहित्य या व्यायामशाळेत असून, अत्याधुनिक साहित्याला मात्र अनेकांनी विरोध केला आहे.

आजच्या जिम संस्कृतीमध्ये केवळ देखाव्यासाठी वातानुकूलित खोलीत पिळदार शरीरावर भर देण्यापेक्षा कसलेले शरीर तयार करण्यावर येथील विद्यार्थ्यांचा भर आहे. कुस्ती, मल्लखांब, दांडपट्टा, कबड्डी, लेझिमचे धडे येथे गिरवण्यात येतात. पाच रुपये दरमहा असे शुल्क आकारणाऱ्या व्यायामशाळेने आज दोनशे रुपये शुल्क केले आहे. १९३०च्या आंदोलनात पुष्कळसे कार्यकत्रे तुरुंगात गेले. त्यामुळे व्यायामशाळेच्या कार्यात शैथिल्य आले. मात्र तरीही कार्यकर्त्यांनी शाळेचे काम नेटाने सुरू ठेवले. दररोज ५० ते १०० मुले येथे नियमित सराव करतात. व्यायामाच्या वाढत्या गरजेमुळे संस्थेतर्फे महाराष्ट्र व्यायामशाळा स्थापन करून अनेक प्रांतांत या संस्थेच्या शाखा सुरू केल्या, पण १९४६मध्ये महाराष्ट्र व्यायामशाळा नागपूर व्यायामशाळेशी संलग्न करण्यात आली. व्यायामशाळेत येणाऱ्या सर्व सदस्य मंडळींच्या अनेक महत्त्वपूर्ण बठकाही त्या काळी व्यायामशाळेतच व्हायच्या आणि त्यातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही स्थापना झाली. अनेक मोठे निर्णय आणि त्याची अंमलबजावणीही व्यायामशाळेतून होत होती.

संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस हेदेखील नागपूर व्यायामशाळेचे विद्यार्थी होते. व्यायामशाळेत पूर्वी लाकडाची हनुमानाची मूर्ती होती. मात्र त्या जागी आता दगडाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. १९८८मध्ये व्यायामशाळेचा जीर्णोद्धार करून नवीन बांधकाम करण्यात आले. व्यायामशाळेचे कार्यकत्रे राज्यस्तरीय स्पर्धेत चमकले असून धनंजय वाडेकर, विजय सप्तर्षी, अनंत वाघाडे, राजू देशमुख यांनी अनेक कबड्डी स्पर्धा गाजवल्या असून विद्याधर मुंडले, किशोर वाशीमकर यांनी कुस्तीमध्ये नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे. नागपूर व्यायामशाळेने ज्याप्रमाणे क्रीडा क्षेत्रात अनेक खेळाडू दिले, त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रात व्यायामशाळेचे कार्यकत्रे आहेत.

नागपूर व्यायामशाळेला गेल्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली, त्याचा अभिमान वाटतो. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना व्यायामशाळेचा लाभ झाला आहे. सरसंघचालकही या शाळेचे विद्यार्थी होते. व्यायामशाळेत जुन्या पद्धतीचे साहित्य असून गेल्या दोन वर्षांपूर्वी आमदार गिरीश व्यास यांनी आपल्या निधीतून नवे साहित्य दिले आहे. मुले मदानी खेळापासून दूर जात असल्याचे लक्षात आल्यापासून आम्ही विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करत आहोत. येत्या काही वर्षांत बॅडिमटनचा हॉल तयार करायचा आहे.  

– राजीव करदळे, सहसचिव, नागपूर व्यायामशाळा