पहिल्या टी-२० सामन्यात भारतने विंडीजवर ५ गडी राखून मात करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विंडीजने भारतासमोर विजयासाठी ११० धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हे आव्हान पार करतानाही भारताचे निम्मे फलंदाज माघारी परतले. मंगळवारी या मालिकेतला दुसरा सामना लखनऊच्या एकना स्टेडीयमवर रंगणार आहे. स्थानिक क्युरेटरनी दिलेल्या माहितीनुसार, या सामन्यातही गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. लखनऊच्या खेळपट्टीवर १३० धावांचा पाठलाग करणंही कठीण जाईल असे संकेत क्युरेटरनी दिले आहेत.

अवश्य वाचा – Ind vs WI : पहिल्या टी-२० सामन्यात झालेले हे ९ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

“या सामन्यात धावांचा पाऊस पडणार नाही. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूवर गवत ठेवण्यात आलं आहे, आणि मधल्या काही भागांत भेगाही असतील. त्यामुळे या खेळपट्टीवर चेंडू धिम्या गतीने उसळी घेईल. याचसोबत फिरकीपटूंसाठी ही खेळपट्टी चांगली असेल.” स्थानिक क्युरेटरने पीटीआयशी बोलत असताना उद्याच्या खेळपट्टीविषयी माहिती दिली. खास या सामन्यासाठी ओडीशातील बोलांगिर भागातून माती आणण्यात आलेली आहे. त्यामुळे मैदानाच्या दोन्ही बाजूंना मोठे फटके खेळताना फलंदाजांना त्रास होऊ शकतो असं क्युरेटने स्पष्ट केलं आहे.

अवश्य वाचा – रोहितने दिनेश कार्तिकऐवजी ऋषभ पंतकडे यष्टीरक्षण सोपवावं – मोहम्मद अझरुद्दीन

इडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात धावांचा पाऊस पडेल अशी सर्वांना आशा होती. मात्र प्रत्यक्षात गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व गाजवलं. भारताकडून कुलदीप यादव, कृणाल पांड्या, खलिल अहमद यांनी टिच्चून मारा केला. विंडीजच्या गोलंदाजांनीही भारताच्या आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांना माघारी धाडत चांगली टक्कर दिली होती. मात्र कृणाल पांड्या आणि दिनेश कार्तिक यांनी संयमी फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IND vs WI : …आणि तो थ्रो पाहून रोहितने मारून घेतला डोक्यावर हात