ब्राझीलमधल्या विश्वचषकात दिग्गज संघांचे पानिपत होताना साऱ्यांनीच पहिले आहेत. असेच अनपेक्षित पराभव पहिल्याच सामन्यात पदरी पडले ते इंग्लंड आणि उरुग्वे या दादा संघांच्या पदरात. त्यामुळे दोन्ही संघांच्या तंबूमध्ये आता ‘जिंकू किंवा मरू’ अशीच परिस्थिती असेल. या सामन्यात जो संघ पराभूत होईल, त्याचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येणार असल्याने दोन्ही संघ जिवाची बाजी लावून मैदानात उतरतील.
इंग्लंडला पहिल्या सामन्यात इटलीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात इंग्लंडचा अव्वल खेळाडू वेन रुनीला गोल करायची संधी होती, पण या संधीचे सोने त्याला करता आले नाही. या सामन्यानंतर रुनीसाठी अधिक सरावाची व्यवस्था करण्यात आल्याचे म्हटले जात आहे, कारण उरुग्वेला इंग्लंड पराभूत करू शकले नाही, तर त्यांना पुढच्या विश्वचषकाची वाट पाहण्यावाचून हाती काहीच उरणार नाही. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने रुनीवर लक्ष केंद्रित करून त्यानुसार रणनीती आखल्याचे म्हटले जात आहे.
उरुग्वेच्या संघाला कोस्टा रिकाचा संघ पराभूत करेल, हे कोणाच्या गावीही नसेल, पण पहिल्या सामन्यात पदरी पडलेल्या पराभवाने उरुग्वेचा संघ चांगलाच हादरला असेल. कोस्टा रिकाने तब्बल तीन गोल लगावल्याने उरुग्वेला बचावाची चिंता सर्वाधिक असेल. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात त्यांच्या आक्रमणामध्येही धार नव्हती. दिएगो फोर्लानसारख्या नावाजलेल्या खेळाडूला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. लुईस सुआरेझचे आगमन ही संघासाठी सुखावणारी गोष्ट असेल. फोर्लान आणि सुआरेझ उरुग्वेसाठी विजय खेचून आणतील का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

सामना क्र. २३
‘ड’ गट : उरुग्वे वि. इंग्लंड
स्थळ : एरिना कोरेनथियान्स, साव पावलो ल्ल वेळ : मध्यरात्री १२.३० वा.
लक्षवेधी खेळाडू
लुईस सुआरेझ (उरुग्वे) : प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक ३१ गोल करून प्रकाशझोतात आलेला उरुग्वेचा अव्वल आक्रमणपटू म्हणून लुईस सुआरेझच्या नावाची स्पध्रेआधीपासून खूप चर्चा होते आहे. परंतु कोस्टा रिकाविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये सुआरेझला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी तो पूर्णपणे फिट असून त्याच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. सुआरेझचा पहिलाच सामना संघासाठी ‘करो या मरो’ असा असल्याने या सामन्यात त्याची जादू चालणार का, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल.

वेन रुनी (इंग्लंड) : सध्या फुटबॉल जगताचे लक्ष नेयमार, लिओनेल मेस्सी यांच्याकडे असले तरी वेन रुनीही त्यांच्याच दर्जाचा खेळाडू आहे, हे विसरून चालणार नाही. इटलीविरुद्धच्या सामन्यामध्ये रुनीला काही खास करता आले नव्हते, पण महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याचा खेळ चांगला होतो, असे म्हटले जाते. त्यामुळे महत्त्वपूर्ण सामन्यात आपले नाणे खणखणीत वाजवून संघाला विजय मिळवून देण्याची संधी रुनीला असेल.

गोलपोस्ट
पहिल्या सामन्यात आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. माझ्याकडून चांगली कामगिरी झाली असली तरी मला संघाला विजय मिळवून देता आला नाही. इंग्लंडविरुद्धचा सामना आमच्यासाठी फार महत्त्वाचा असेल. लुईस सुआरेझचे संघात झालेले आगमन ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.
– एडिन्सन काव्हानी (उरुग्वे)

आमच्यासाठी हा ‘करो या मरो’ असा सामना असून संघात फार गंभीर वातावरण आहे. पहिला विजय मिळवण्यासाठी संघ काहीही करायला तयार असून त्यासाठी कसून सराव आम्ही करत आहोत. या सामन्यात विजयासाठी आम्ही जिवाचे रान करू. वेन रुनीकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.
-डॅनियल स्टुरिज (इंग्लंड)

आमनेसामने
सामने : २
उरुग्वे : विजयी १ बरोबरी : १