राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इंग्लंड, स्कॉटलंड आदी देशांच्या खेळाडूंचे आव्हान असले तरी यंदा भरपूर सराव व आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय बॉक्सर्स किमान पाच सुवर्णपदकेजिंकतील, असे भारतीय संघाबरोबर असलेले प्रशिक्षक जयसिंग पाटील यांनी सांगितले.

पाटील हे आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटमधील खेळाडूंसाठी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या संस्थेतील पाच खेळाडू आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. भारतीय संघासाठी इव्हाना सॅन्तियागो हे परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासमवेत पाटील हे भारतीय संघाला मार्गदर्शन करीत आहेत. भारतीय खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेसाठी गोल्ड कोस्ट येथील क्रीडाग्राममध्ये स्थानापन्न झाले आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंना पदकाच्या किती आशा आहेत असे विचारले असता पाटील यांनी सांगितले, ‘‘विकास कृष्णन, मनोज कुमार, मेरी कोम, सरिता देवी, अमित कुमार यांच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे सतीश कुमार, गौरव सोळंकी, हुसामुद्दिन, मनीष कौशिक यांच्याकडून आश्चर्यजनक विजय नोंदवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कौशिकने राष्ट्रीय स्पर्धेत तसेच भारतीय संघ निवड चाचणीत शिवा थापासारख्या बलाढय़ खेळाडूवर मात केली आहे. भारतीय संघात यंदा अनुभवी व युवा खेळाडूंचा योग्य समतोल साधला गेला आहे.’’

‘‘भारतीय खेळाडूंना प्रामुख्याने इंग्लंड, स्कॉटलंड, उत्तर आर्यलड, न्यूझीलंड यांच्या खेळाडूंशी झुंजावे लागणार आहे. अर्थात ३ एप्रिल रोजी सामन्यांची कार्यक्रम पत्रिका जाहीर होणार आहे, त्यामध्ये भारतीय खेळाडूंना पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये कोणते प्रतिस्पर्धी असतील हे निश्चित होईल. त्या वेळी पदकांचा अंदाज बांधता येईल. तरीही गेल्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा आमच्या खेळाडूंनी खूप तयारी केली आहे. गेल्या दीड वर्षांत भारतीय संघातील संभाव्य खेळाडूंना परदेशातील पाच-सहा स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आहे. तेथील अनुभवाचा फायदा त्यांना आगामी लढतींसाठी, मनोधैर्य उंचावण्यासाठी होणार आहे,’’ असेही पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘भारतीय खेळाडूंना अधिकाधिक सुविधा व सवलती मिळाव्यात यासाठी भारतीय बॉक्सिंग महासंघाने (बीएफआय) खूप चांगल्या योजना अमलात आणल्या आहेत. भारताच्या सराव शिबिरात एक डझन प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले होते. तसेच पोषक आहार, पूरक व्यायाम, फिजिओ, मसाजिस्ट आदी सुविधांमुळे खेळाडू खूप खूश आहेत. त्याचप्रमाणे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा कारभार ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते नेमबाज राजवर्धनसिंह राठोड यांच्याकडे आल्यानंतर आमच्या खेळासाठी खूप सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. ऑस्ट्रेलियातील वातावरणाशी अनुकूलता निर्माण व्हावी यासाठी आम्ही येथे स्पर्धेपूर्वी एक आठवडा अगोदरच आलो आहोत. त्याकरिता केंद्र शासनाने भरघोस मदत केली आहे.’’