भारतात आगामी वर्षात प्रस्तावित टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावरुन पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये मैदानाबाहेर सामना रंगायला सुरुवात झाली आहे. पाक क्रिकेट बोर्डाचे सीईओ वासिम खान यांनी भारतात टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाला विरोध केला आहे. भारताऐवजी युएईत स्पर्धेचं आयोजन करावं अशी मागणी वासिम खान यांनी केली आहे.

“भारतात टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल अद्याप अनिश्चीतता आहे. करोनामुळे सध्या तिकडे स्पर्धा भरवण्याऐवजी युएईत स्पर्धा भरवायला हवं. PCB चे अध्यक्ष एहसान मणी यांनी आयसीसीला पत्र लिहून दोन्ही देशांमधली सध्या राजकीय संबंध पाहता…पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसाची समस्या येणार नाही असं लिखीत स्वरुपात आश्वासन मागितलं आहे.” वासिम खान एका यु-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

काही दिवसांपूर्वी आयसीसीने २०२१ च्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन भारतातच होईल असं जाहीर केलं होतं. बीसीसीआयनेही आगामी वर्षात आयपीएल आणि टी-२० विश्वचषकाचं आयोजन हे भारतातच करण्याचं ठरवलं आहे. यासाठी Bio Secure Bubble तयार करण्याची तयारीही BCCI ने दर्शवली आहे.