भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) बहिष्काराचा इशारा दिला असला तरी २०२२च्या बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी या खेळाचा समावेश करणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) दिले आहे. लवकरच या दोन संघटनांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

‘सीजीएफ’चे प्रमुख लुइस मार्टिन तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड गेव्हेमबर्ग यांनी आयओएचे अध्यक्ष नरिंदर बात्रा तसेच महासचिव राजीव मेहता यांच्यात शुक्रवारी बैठक होणार आहे. ‘‘सद्य:स्थितीला २०२२च्या राष्ट्रकुलमध्ये नेमबाजीचा समावेश करता येणार नाही. मात्र नेमबाजी या खेळाविषयी चर्चा नक्कीच करता येईल,’’ असे ‘सीजीएफ’चे प्रसारमाध्यम संचालक टॉम डेगून यांनी सांगितले.

नेमबाजी खेळाविषयीचा निर्णय बदलण्यासाठी ‘आयओए’ ही ‘सीजीएफ’चे मन वळवण्याचा प्रयत्न करीत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा प्रमुख खेळांमध्ये समावेश करण्याविषयी या बैठकीत चर्चा केली जाईल. जेणेकरून भविष्यात सर्व राष्ट्रकुल स्पर्धामध्ये नेमबाजी हा खेळ असेल, असे संकेतही डेगून यांनी दिले. मात्र हा खेळ प्रमुख खेळांमध्ये आणण्यासाठी आचारसंहितेत बदल करावा लागेल, त्यासाठी अधिक वेळ लागेल, असेही ‘सीजीएफ’कडून स्पष्ट करण्यात आले.