केनिया, इथिओपिया यांच्यासह दीडशे परदेशी धावपटूंसह २५ हजार धावपटू येथे रविवारी होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीत सहभागी झाले आहेत.
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन समितीचे कार्याध्यक्ष अतुल चोरडिया यांनी ही माहिती दिली. रविवारी सकाळी ५.४५ वाजता खंडुजीबाबा चौकातून (लकडी पूल) मुख्य मॅरेथॉनला उद्योजक योहान पूनावाला यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. मुख्य शर्यतीबरोबर पुरुष व महिला गटाच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीसाठी तसेच दहा किलोमीटर अंतराच्या शर्यतीसाठी पाच हजार प्रवेशिका आल्या आहेत. स्पर्धेसाठी ५० लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी २७ लाख रुपयांची पारितोषिके पुणे महानगरपालिकेतर्फे दिली जाणार आहेत. यासह क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा रोहन मोरे, कौस्तुभ राडकर यांचा सत्कार केला जाईल.