News Flash

क्रीडा संस्कृती की विकृती?

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केरळमधील एका जलक्रीडा केंद्रात सराव करणाऱ्या चार महिला खेळाडूंनी विषारी फळे खाऊन..

| May 17, 2015 05:53 am

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केरळमधील एका जलक्रीडा केंद्रात सराव करणाऱ्या चार महिला खेळाडूंनी विषारी फळे खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या व त्यामधील अपर्णा रामभद्रन हिचे निधन झाल्याच्या वृत्ताने देशभर खळबळ उडाली. देशात क्रीडा संस्कृती रुजवण्यात भारतीय क्रीडा k01प्राधिकरणाची भूमिका निर्णायक आहे. मात्र आत्महत्येसारखे घटनेमुळे क्रीडा विकासाला खीळ बसण्याची शक्यता आहे. तूर्तास तरी अशा दुर्घटना टाळणे हेच प्राधान्य असायला हवे. क्रीडा संस्कृती रुजण्यासाठी अधिक कालावधी लागला तरी बेहतर.
देशाच्या क्रीडा क्षेत्राला काळिमा फासणारी ही घटना आहे. खेळाडू हे अनेकांसाठी अनुकरणीय असतात. त्यांच्याकडून नव्या पिढीला प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळत असते. सचिन तेंडुलकर, लिअँडर पेस, विश्वनाथन आनंद, एम.सी. मेरी कोम, सायना नेहवाल आदी अनेक भारतीय खेळाडू भारताचे राजदूत असल्याचे आपण मानत असतो. असे असूनही दुसरीकडे खेळाडूंची कशी अवहेलना केली जाईल अशीच वृत्ती अनेक क्रीडा संघटक, प्रशिक्षक, वरिष्ठ खेळाडूंमध्ये दिसून येत असते.
देशातील खेळाडूंना ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये पदक मिळवून देण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे सोपविण्यात आली आहे. त्या दृष्टीने त्यांच्याकडून प्रयत्न केले जात असतात याबाबत तिळमात्र शंका नाही. तरीही साई संस्थेच्या क्रीडा संकुलामध्ये सराव करणाऱ्या, त्यांच्या वसतिगृहात राहणाऱ्या खेळाडूंची सुरक्षा व्यवस्था हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. वसतिगृहाबाहेरील व्यक्तींकडून होणाऱ्या त्रासापासून संरक्षण देणे हे जसे तेथील व्यवस्थापकांचे काम असते, तसेच अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचीही जबाबदारी त्यांच्याकडे असते.
वरिष्ठ खेळाडूंकडून कनिष्ठ खेळाडूंचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण केले जात असते. आपल्या जर्सी व बूट धुण्यापासून लैंगिक शोषणापर्यंतच्या अनेक त्रासांना कनिष्ठ खेळाडूंना सामोरे जावे लागते. मध्यंतरी महाराष्ट्रातील एका मल्लाची राष्ट्रीय निवड चाचणी शिबिरासाठी निवड झाली होती. हे शिबीर उत्तर भारतात आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात या महाराष्ट्राच्या खेळाडूच्या वजनी गटात उत्तर भारतातील एक मल्ल होता. साहजिकच आपल्या राज्याच्या मल्लाचीच भारतीय संघात निवड होण्यासाठी उत्तरेकडील मल्लांनी महाराष्ट्राच्या मल्लास या शिबिरातून कसे हुसकावले जाईल या दृष्ट्रीनेच त्याचा अतोनात मानसिक व शारीरिक छळ केला. दुर्दैवाने या त्रासास कंटाळून त्याने शिबिरातून माघार घेतली. विविध राज्यांमधील व विविध भाषक खेळाडू एकत्र आले तर ज्या भाषेचे किंवा राज्याचे अधिक खेळाडू असतात, ते दादागिरी करीत असतात. दुबळ्या खेळाडूंचा या दादागिरीपुढे निभाव लागत नाही.
केवळ वरिष्ठ खेळाडू नव्हे, तर प्रशिक्षक, संघटक व निवड समिती सदस्यांकडूनही खेळाडूंचे शोषण केले जात असते. मध्यंतरी भारतीय वेटलिफ्टिंग संघातील दोन-तीन महिला खेळाडूंनी परदेशी प्रशिक्षकाकडून बळजबरीने आपल्याला उत्तेजक औषध दिले जात असल्याचा आरोप केला होता. हा आरोप सिद्ध झाल्यानंतर त्या परदेशी प्रशिक्षकाची मायदेशी हकालपट्टी करण्यात आली होती. भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघातील खेळाडूंनी परदेशातील दौऱ्यात संघाच्या प्रशिक्षकाकडूनच लैंगिक छळ केला जात असल्याचा आरोप केला होता. अनेक खेळांच्या निवड समिती प्रक्रियेत सहभागी असलेल्या वरिष्ठ संघटकांकडून व निवड समिती सदस्यांकडून महिला खेळाडूंवर लैंगिक अत्याचार झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.
आपल्या देशात आजपर्यंत असे अनुचित प्रकार अनेक वेळा घडले आहेत आणि अजूनही घडत आहेत. दुर्दैवाने अशा घटनेतील आरोपींना संघटनात्मक स्तरावर व राजकीय नेत्यांकडून पाठीशी घातले जाते. जर अशा घटनांना वाचा फोडली तर क्रीडा कारकीर्दीतून उठविले जाण्याची धमकीही या खेळाडूंना दिली जाते. मानसिक दडपणाखाली हे खेळाडू मौन पाळतात व आपोआपच दोषी व्यक्ती पुन्हा नवीन दुष्कृत्ये करण्यासाठी मोकाट सुटतात. काही आरोपींची चौकशी झालीच तर अनेक वेळा सबळ पुराव्याअभावी त्यांना निदरेष सोडले जाते. अशा आरोपींविरुद्ध साक्ष देण्याची हिंमत कोणाकडे नसते. समजा एखाद्याने तसा प्रयत्न केला तर त्याचाही अतोनात शारीरिक व मानसिक छळ होतो. खरे तर अशा घटनांबाबत फौजदारी खटल्याप्रमाणे चौकशी करीत दोषी व्यक्तींविरुद्ध तुरुंगवासाची कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही तोपर्यंत अशा घटना सुरूच राहणार. हीच भारतीय क्रीडा क्षेत्राची शोकांतिका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 5:53 am

Web Title: 4 female athletes in suicide pact chaos in sports
Next Stories
1 अभिजित कटकेचा पंधरा सेकंदात विजय
2 तेरा मल्ल व तीन प्रशिक्षकांवर कारवाई
3 वेंगसरकर यांच्या पुनरागमनामुळे सत्ताधाऱ्यांच्या पदांची पुनर्रचना
Just Now!
X