मेलबर्न : अबू धाबी आणि लॉस एंजेलिस येथून खेळाडूंना घेऊन येणाऱ्या चार्टर्ड विमानात चार जण करोनाग्रस्त आढळून आल्याने ग्रँडस्लॅम विजेत्या अव्वल खेळाडूंसह ४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी करण्यात आली आहे.

करोनाग्रस्तांच्या संपर्कात आलो नसलो तरी सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागणार असल्यामुळे काही टेनिसपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. काही खेळाडूंना हॉटेलबाहेर पडण्याची परवानगी नसली तरी बहुतांश टेनिसपटूंना दिवसातून पाच तास सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र सर्व खेळाडूंना धोक्याचा इशारा देण्यात आला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

‘‘नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंना सक्त ताकीद देण्यात आली आहे. कुणी जैव-सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास, जबर दंड ठोठावण्यात येईल अथवा अधिक सुरक्षित विलगीकरणात पोलिसांच्या पहाऱ्याखाली राहावे लागेल,’’ असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शनिवारी तीन करोनाग्रस्त आढळून आल्याचे सांगण्यात आले होते. पण रविवारी पत्रकार परिषद घेऊन व्हिक्टोरिया राज्याच्या विलगीकरण आयुक्त एम्मा कासार यांनी चौथ्या व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्याचे स्पष्ट केले. मात्र या चौघांमध्ये एकाही खेळाडूचा समावेश नाही. बियांका आंद्रेस्कू हिचे प्रशिक्षक सिल्विन ब्रूनेयू यांना करोना झाला आहे.

विलगीकरणाच्या नियमाबद्दल टेनिसपटू सोराना क्रिस्तियाने नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘या नियमाबद्दल आधीच कल्पना असती तर ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत खेळलेच नसते. मी घरी राहणे पसंत केले असते. २० टक्के क्षमतेने आम्हाला येथे आणले जाईल, त्यामुळे कुणाच्या संपर्कात येण्याचा प्रश्नच नव्हता. पण सरकारी अधिकारी हे दावे फेटाळत आहेत,’’ असे क्रिस्तिया म्हणाली.