लंडन येथे पार पडलेल्या हॉकी वर्ल्डलीग सेमीफायनल स्पर्धेत भारतीय संघाला अनपेक्षित पराभवांचा धक्का सहन करावा लागला. सर्वात प्रथम मलेशिया आणि त्यानंतर दुबळ्या कॅनडाच्या संघानेही भारतावर मात केली. यानंतर हॉकी इंडियाने प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांची पदावरुन हकालपट्टी करत महिला संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्याकडे भारतीय संघाची कमान सोपवली. संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्र सांभाळल्यानंतर जोर्द मरीन यांच्या भारतीय संघाने आशिया चषकावर आपले नाव कोरले. तब्बल १० वर्षांनी भारताने हा चषक जिंकल्यामुळे या विजयाला एक वेगळचं महत्व प्राप्त झालं आहे.

अंतिम फेरीत भारताने मलेशियावर २-१ अशी मात केली. तसेच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवरही भारताने दोनवेळा मात केली. आपल्या संघाच्या कामगिरीचं कौतुक करताना मरीन यांनी आकाश चिकटे आणि सुरज करकेरा यांच्या कामगिरीचं विशेष कौतुक केलं. एखाद्या विजयानंतर मी कधीही एका विशिष्ट खेळाडूचं कौतुक करत नाही. परंतु आकाश आणि सुरज यांनी श्रीजेशच्या अनुपस्थिती ज्या पद्धतीने खेळ केला, त्याचं खरंच कौतुक करावं लागेल. एक प्रशिक्षक म्हणून मी त्यांच्या कामगिरीवर खूश असल्याचं, मरीन यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं.

मात्र, या विजयानंतर गाफील राहणं भारताला परवडणारं नसल्याचे मरीन यांनी सांगितले. आपल्या कामगिरीत सातत्य कायम राखण्यासाठी भारताला मेहनत घ्यावी लागणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचं आक्रमण हे वाखणण्याजोगं होतं, मात्र, मिळालेल्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करण्यात भारताचे खेळाडू अजुनही कमी पडत आहेत. मलेशियाविरुद्ध अंतिम सामन्यात भारतीय संघाने पहिल्या सत्रात चांगला खेळ केला. मात्र, दुसऱ्या सत्रात भारताचे सगळे डावपेच फसल्याचंही मरीन म्हणाले. त्यामुळे भारतीय संघाला आपला खेळ सुधारण्यासाठी आणखी वाव असल्याचंही मरीन म्हणाले. १ ते १० डिसेंबरदरम्यान भुवनेश्वरमध्ये वर्ल्ड हॉकी लीग फायनल स्पर्धा रंगणार आहे. त्यासाठी भारतीय संघ ‘साई’च्या बंगळुरुमधील शिबीरात सहभागी होणार आहे. आगामी स्पर्धांमध्ये भारतीय संघाला तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांशी सामना करायचा आहे. या आव्हानाला भारतीय संघ कसा सामोरा जातो हे पहावं लागणार आहे.