माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरने मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना द.आफ्रिकेच्या फलंदाजांवर स्तुतीसुमने उधळली. सचिनने यावेळी विशेष करून द.आफ्रिकेचा कर्णधार ए.बी.डीव्हिलियर्सच्या फलंदाजीचे कौतुक केले. द.आफ्रिकेने वानखेडेवरील सामन्यात दमदार फलंदाजीचा नजराणा पेश केला. द.आफ्रिकेच्या विजयात क्विंटन डी कॉक, फॅफ डू प्लेसिस आणि ए.बी.डीव्हिलियर्स यांच्या शतकी खेळीचा मोलाचा वाटा होता पण डीव्हिलियर्सची फलंदाजी उत्तम होती, असे मत सचिनने व्यक्त केले.

डी’व्हिलियर्स सध्याचा आघाडीचा फलंदाजी आहे असे वाटत का? या प्रश्नाच्या उत्तरात सचिनने क्षणाचाही विलंब न करता अतिशय ठामपणे डी’व्हिलियर्स सध्याचा नंबर एकचा फलंदाज असल्याचे सांगितले. डी’व्हिलियर्स सध्या आपल्या करिअरच्या शिखरावर असून तो अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करत असल्याचेही तो पुढे म्हणाला.

डी’व्हिलियर्स एकदिवसीय सामन्यांमधला सध्याचा आघाडीचा फलंदाज असून वानखेडेवर त्याने ठोकलेले शतक पाहता त्याने पहिले वीस चेंडू त्याने संयमाने खेळले. स्थिरस्थावर होऊन आपल्या खेळीला आकार कसा द्यायचा याचे गमक प्राप्त झाल्यानंतर त्याने फटकेबाजीला सुरूवात केली आणि शतकी खेळी साकारली. त्याच्या खेळीत जबाबदारीचा प्रत्यय आला त्याने ज्यापद्धतीने फलंदाजी केली त्याचे श्रेय त्याला द्यायलाच हवे, असे देखील सचिन म्हणाला.