दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डीव्हिलियर्सने एकदिवसीय सामन्यांमधील कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘गेल्या वर्षभरापासून माझ्या कर्णधारपदाविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण आता मी माझी भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. मी एकदिवसीय सामन्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा देतोय’ असे डीव्हिलियर्सने म्हटले आहे.

एबी डीव्हिलियर्सच्या कर्णधारपदावरुन गेल्या काही महिन्यांपासून चर्चा रंगली होती. बुधवारी संध्याकाळी एबी डीव्हिलियर्सने ट्विटर आणि फेसबुकवर एक व्हिडिओ अपलोड केला. यात डीव्हिलियर्सने एकदिवस सामन्यांमधील कर्णधारपदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा केली. ‘गेल्या वर्षभरात मी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. आता मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकलो आहे.  आता मला माझ्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचे आहे.  २००४ पासून दक्षिण आफ्रिकेसाठी वन डे, कसोटी आणि टी-२० सामन्यांमध्ये खेळत आहे’ असे त्याने नमूद केले.

दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट मंडळाने मला एवढी वर्ष संघाकडून खेळण्याची संधी दिली. मी संघाऐवजी स्वतःचा विचार केल्याची टीकाही माझ्यावर झाली. पण हे सत्य नव्हते. दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे डीव्हिलियर्सने सांगितले.

फाफ डू प्लेसिसने टी-२० आणि कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेची धूरा समर्थपणे सांभाळली आहे. त्यामुळे आता मी वन डे संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला असे डीव्हिलियर्सने म्हटले आहे. गेली ६ वर्ष मी संघाचा कर्णधार होतो. आता संघासाठी नवीन कर्णधार निवडण्याची वेळ आली असून नवीन कर्णधाराला माझा पाठिंबा असेल. मी कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी तिन्ही फॉर्मेटमध्ये मी संघासाठी उपलब्ध असेन असे सांगत डीव्हिलियर्सने निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.