भारताला ऑलिम्पिकमध्ये एकमेव सुवर्ण पदक मिळवून देणारा नेमबाज अभिनव बिंद्राने रविवारी नेमबाजीतून  निवृत्त होत असल्याची अधिकृत घोषणा केली. तरुण पिढीला संधी देण्यासाठी आता पुढे जाण्याची वेळ आल्याचे सांगत बिंद्राने पिस्तूल खाली ठेवत असल्याचे जाहीर केले.  यंदाच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बिजींग सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक म्हणून दिसला होता.  रियो ऑलिम्पिक स्पर्धेत पाचव्यांदा ऑलिम्पिकच्या मैदानात उतरलेल्या बिंद्राला यावेळी पदकाने अखेरच्या क्षणी हुलकावणी दिली होती.  बिंद्राने २००८ मध्ये बीजिंग येथे रंगलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली होती.  ही पुनरावृत्ती रिओ ऑलिम्पिकच्या मैदानात करण्यास  बिंद्रा अपयशी ठरला होता. नेमबाजीच्या मैदानात त्याने चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्याला पदक मिळविण्यात अपयश आले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याला १० मी. एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाने अवघ्या ०.५ गुणांच्या फरकाने हुलकावणी दिली होती. पात्रता फेरीत ७ वे स्थान प्राप्त करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविलेल्या अभिनव बिंद्राला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.