इंडियन प्रिमीअर लिगमधील महत्वाच्या संघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाने आपल्या, KKR Cricket Academy साठी मुंबईच्या अभिषेक नायरची प्रशिक्षकपदावर नेमणूक केली आहे. बुधवारी कोलकात्याच्या संघ व्यवस्थापनाद्वारे या नवीन अकादमीची घोषणा करण्यात आली. या अकादमीद्वारे कोलकात्यातील उदयोनमुख क्रिकेटपटू आणि संघातील खेळाडूंना अद्ययावत तंत्रज्ञानामार्फत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने विशेष कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकी मैसूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे अभिषेकच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

आयपीएलच्या अकराव्या हंगामात अभिषेक नायर कोलकात्याच्या Coaching Staff मध्ये सहभागी झाला होता. यावेळी दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता संघाने अंतिम ४ जणांमध्ये स्थान मिळवलं होतं, मात्र अंतिम फेरी गाठणं त्यांना शक्य झालं नव्हतं. “एक खेळाडू म्हणून अभिषेकचं क्रिकेटप्रती असणारं प्रेम आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्या अंगात जी प्रतिभा आहे, तिला वाव देण्यासाठी हे प्रशिक्षकपद योग्य संधी आहे.”

प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अभिषेक नायरने ९९ सामन्यांमध्ये मुंबईचं प्रतिनिधीत्व केलं होतं. काही दिवसांपूर्वी पाँडीचेरी क्रिकेट बोर्डाने अभिषेक नायरला आपल्या संघाचा मार्गदर्शक वजा खेळाडू बनण्याची ऑफर दिली होती. मात्र अभिषेकने ही ऑफर अमान्य केली होती. अभिषेक नायरने आतापर्यंत ३ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. याचसोबत मुंबईचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक ओमकार साळवी यालाही KKR Cricket Academy च्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नेमण्यात आलेलं आहे.