भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केल्यांनतर त्याच्या जगभरातल्या चाहत्यांना धक्का बसला आहे. धोनीच्या निवृत्ती नंतर अनेकांनी दुखः ही व्यक्त केलं. धोनीच्या अश्याच एका आंतरराष्ट्रीय चाहत्यानेही त्याच्या निवृत्ती नंतर क्रिकेटचे सामने न पाहण्याचा निर्णय घेतला आहे.  आपणही निवृत्ती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संघाचा सामना असतो तेव्हा लव्ह यू धोनी, मिस यू धोनी ही वाक्ये आणि धोनीची विविध रूपांतील छायाचित्रे यांचा समावेश असलेले कपडे घातलेले क्रिकेटजगतामध्ये ‘शिकागो चाचा’  म्हणून लोकप्रिय असलेले मोहम्मद बशीर बोझाई यांनाही धोनीच्या निवृत्तीने दुखः झाले आहे.

पाकिस्तानच्या कराचीमध्ये जन्म झालेल्या मोहम्मद बशीर बोझाई यांनी महेंद्रसिंह धोनीच्या आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केल्यानंतर आपलीही निवृत्ती जाहीर केली. यापुढे होणाऱ्या भारत पाकिस्तान दरम्यानच्या आंतराष्ट्रीय सामने न पाहण्याचा निर्णय शिकागो चाचांनी घेतला आहे. धोनीच्या निवृत्ती नंतर हे सामने पाहण्यात काही अर्थ नाही असं त्यांनी म्हटंल आहे. पीटीआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

आता धोनीला भेटण्यासाठी रांचीला येणार आहेत असे मोहम्मद बशीर यांनी सांगितले. मोहम्मद बशीर हे शिकागो मध्ये एक रेरेस्टॉरंट चालवतात. २०११ साली भारत पाकिस्तान दरम्यान मोहाली येथे झालेल्या सामन्याला बशीर यांनी पहिल्यांदा धोनीला पाहण्यासाठी हजेरी लावली होती. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या प्रत्येक आंतराष्ट्रीय सामन्यात विशेष कपडे घालून उपस्थित राहत.

धोनीच्या निवृत्तीनंतर आता पुन्हा क्रिकेट पाहण्यासाठी दुसऱ्या देशात जाईल असे वाटत नाही. सगळ्या महान खेळाडूंना कधी तरी निवृत्ती घ्यावीच लागते. मात्र धोनीच्या निवृत्तीने मला खूप दुखः झाले. त्याने त्याची निवृत्ती शानदारपणे जाहीर करायला हवी होती, असे मोहम्मद बशीर म्हणाले.