सध्या संपूर्ण जग करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत आहे. बहुतांश देशात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र ऑस्ट्रेलियात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे यंदाचा टी-२० विश्वचषक पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळख असलेल्या बीसीसीआयनेही आपला आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलत वर्षाअखेरीस आयपीएल स्पर्धा खेळवता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर यांच्या मते टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास आयपीएललाही मान्यता मिळायला नको. “टी-२० विश्वचषकाच्या जागी आयपीएल खेळवण्यास माझा विरोध आहे. जागतिक स्पर्धेला पहिलं प्राधान्य मिळायला हवं. त्यामुळे जर टी-२० विश्वचषक रद्द होणार असेल तर तोच न्याय आयपीएलसाठीही लावला गेला पाहिजे.” बॉर्डर ऑस्ट्रेलियातील स्थानिक रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. केवळ पैशांसाठी हा निर्णय घेतला जाणार असेल तर ते चूक असल्याचंही बॉर्डर म्हणाले. पहिली संधी ही टी-२० विश्वचषकालाच मिळायला हवी असं बॉर्डर यांनी स्पष्ट केलं.

अवश्य वाचा – कृपा करुन आम्हाला विदेशी टी-२० लिग खेळण्याची परवानगी द्या – रॉबिन उथप्पा

टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द होऊन त्या जागी आयपीएल खेळवण्यात आलं तर त्यामुळे चुकीचा पायंडा पाडला जाईल असंही बॉर्डर म्हणाले. “वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करण्यात आलं, तर इतर देशांनी निषेध म्हणून आपल्या खेळाडूंना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाठवू नये. या सर्व घडामोडींमागे भारताचा हात आहे.” बॉर्डर यांनी आपलं मत व्यक्त केलं असलं तरीही सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंनी प्रेक्षकांविना आयपीएल खेळण्याची तयारी दाखवली आहे. आयपीएलच्या माध्यमातून अन्य क्रिकेट बोर्डांनाही चांगलं उत्पन्न मिळतं. यासाठी सध्याच्या घडीला आयसीसीचं अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी इतर देश आयपीएलला विरोध करणार नाहीत असं चित्र दिसतंय.