आयपीएल अर्थात इंडियन प्रिमीअर लिग या स्पर्धेने फार कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं वेगळं स्थान तयार केलं. कोट्यवधींची बोली, मनोरंजन आणि इतर गोष्टींमुळे अनेक क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असतात. प्रत्येक हंगामाआधी आयपीएलमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला जातो. या लिलावात प्रत्येक संघ आपल्या आवडत्या खेळाडूवर बोली लावून त्याला आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा या लिलावात खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांच्या लागलेल्या बोलीच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. मात्र आयपीएलच्या लिलावाची कल्पना कशी सुचली, याची रंजक माहिती माजी COO (Chief Operating Officer) सुंदर रमण यांनी सांगितली. ते TV Presenter गौरव कपूरच्या यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“खेळाडूंच्या लिलावाची कल्पना ही अगदी संध्याकाळी चहा घेत असताना डोक्यात आली. आयपीएलच्या पहिल्या हंगामाच्यावेळी आम्ही अनेक गोष्टींवर काम करत होतो. संघाची विक्री झाली होती, प्रत्येक संघाची नावं ठरली होती. सामने कुठे खेळवायचे हे निश्चीत झालं होतं. आता खेळाडूंना प्रत्येक संघात कसं विभागायचं हा प्रश्न आमच्यासमोर होता. एक गोष्ट निश्चीत झाली होती की महत्वाचे खेळाडू हे आपल्या घरच्या संघाकडून खेळतील. म्हणजे सचिन मुंबईकडून, युवराज पंजाबकडून, सेहवाग दिल्लीकडून, गांगुली कोलकात्याकडून…मात्र धोनीसाठी कोणताही संघ उरत नव्हता. उरलेल्या खेळाडूंचं काय करायचं हा प्रश्न असताना, एका संघमालकांने आपण खेळाडूंचा लिलाव केला तर?? असा पर्याय सूचवला. दोन मिनीटं चर्चा केल्यानंतर तो पर्याय मला आवडला. यातून चाहत्यांची स्पर्धेविषयी उत्सुकता वाढेल असं मला वाटलं.” रमण यांनी आयपीएलच्या लिलावाची कल्पना कशी सूचली हे सांगितलं.

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव कोलकाता शहरात पार पडला, ज्यात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सवर सर्वाधिक बोली लागली. २९ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार होती, मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. मात्र यंदाचा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागणार आहे, त्यामुळे सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्यात बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. यासाठी आयसीसी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबद्दल काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.