राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धा गाजवणारा बुद्धिबळपटू विक्रमादित्य कुलकर्णी याला तीन वेळा पराभवामुळे ग्रँडमास्टर नॉर्मने हुलकावणी दिली. पण आइनस्टाइनच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित असलेल्या विक्रमादित्यने पुढील वर्षभरात ग्रँडमास्टर किताब मिळवण्याचे ध्येय बाळगले आहे. अलीकडेच मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावून विक्रमादित्यने आपल्या ध्येयाच्या दिशेने कूच केली. आतापर्यंतच्या कामगिरीविषयी विक्रमादित्यने लोकसत्ताशी मनमोकळ्या गप्पा मारल्या..
तुझी बुद्धिबळातील वाटचाल कशी सुरू झाली?
तिसरीत शिकत असताना मोठय़ा बहिणीने मला बुद्धिबळाची ओळख करून दिली. सातवीत असताना डोंबिवलीतील श्रीखंडे सरांकडून मी बुद्धिबळाचे धडे गिरवले. त्यानंतर माझ्या स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळाला सुरुवात झाली.१९९९ मध्ये राज्य ज्युनियर आणि २००१मध्ये राज्य खुल्या अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद मी पटकावले. राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेत दोन वेळा मी अव्वल आलो. त्यानंतर राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेत चौथे स्थान पटकावल्यामुळे मला केरळला झालेल्या जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. जानेवारी १९९९ मध्ये रेटिंग मिळाल्यानंतर क्रीडा कोटय़ातून २००४ला मी पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीसाठी रुजू झालो.
तू कोणते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहेस?
तीन वेळा मला ग्रँडमास्टर नॉर्मने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे वर्षभरात तीन ग्रँडमास्टर नॉर्म मिळवून ग्रँडमास्टर किताब मिळवण्याचे माझे ध्येय आहे.
महाराष्ट्रात दर्जेदार स्पर्धाची वानवा जाणवते का?
दक्षिण भारतातील राज्यांच्या मानाने महाराष्ट्रात होणाऱ्या स्पर्धाची संख्या कमी आहे. तरीही मुंबई महापौर चषकसारख्या चांगल्या स्पर्धा होत आहेत. चागंले खेळाडू घडवण्याच्या उद्देशाने भविष्यात स्पर्धाची संख्या वाढायला हवी आणि त्यात सातत्य असायला हवे.
विश्वनाथन आनंद वगळला तर भारताला दुसरा विश्वविजेता बुद्धिबळपटू घडवता आला नाही, याबाबत काय सांगशील?
भारतात गुणवान खेळाडू मोठय़ा प्रमाणात आहेत. पण त्यापैकी एखादा खेळाडू विश्वविजेता होईल, यासाठी सांघिक प्रयत्न होताना दिसत नाहीत. रशियात बुद्धिबळ खेळ लोकप्रिय असल्यामुळे ते अनेक विश्वविजेते घडवू शकले. भारतात वैयक्तिक कामगिरीच्या जोरावरच बुद्धिबळपटूंची घोडदौड सुरू आहे. सूर्यशेखर गांगुली, पी. हरिकृष्ण हे आनंदनंतर दुसऱ्या फळीतील बुद्धिबळपटू आहेत. पण ते स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर पुढे आले आहेत. वयोगटात आशियाई आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जेतेपद मिळवणारेही अनेक खेळाडू आपल्याकडे आहेत. पण त्यांच्यातील गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजेत, त्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडत आहोत.
भारताचे बुद्धिबळातील भवितव्य किती उज्ज्वल आहे, असे तुला वाटते?
भारतात अनेक क्षेत्रांत जशी गुणी माणसे आहेत, त्याचप्रमाणे बुद्धिबळातही दर्जेदार खेळाडू पुढे येत आहेत. बुद्धिबळासाठी लागणारे अद्ययावत तंत्रज्ञानही भारतात उपलब्ध आहे. सांघिक प्रयत्न होऊ लागल्यानंतर भारतीय बुद्धिबळपटूही आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मजल मारतील, असे मला वाटते.
बुद्धिबळाकडे वळणाऱ्या उदयोन्मुख खेळाडूंना काय सल्ला देशील?
ज्यांना बुद्धिबळाची आवड आहे, त्यांना बुद्धिबळापासून दूर करू नका आणि आवड नसलेल्यांना बळजबरीने बुद्धिबळ खेळण्यासाठी भाग पाडू नका, असा लहान मुलांच्या पालकांना माझा सल्ला असतो. बुद्धिबळाचा फायदा अभ्यासात होतो, असे ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद आणि गॅरी कास्पारोव्ह यांचे मत आहे, पण ज्या वेळी मी खूप अभ्यास करायचो, त्यानंतर मला बुद्धिबळ खेळताना जास्त मेहनत घ्यावी लागत नव्हती. त्यामुळे अभ्यासाचा फायदा मला बुद्धिबळ खेळताना झाला, असेच मी म्हणेन.