राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली असली तरी चांगल्या पगाराची नोकरी न करता नेमबाजी हाच माझा श्वास आहे आणि त्यामध्येच कारकीर्द करण्याचे माझे ध्येय आहे, असा विश्वास कऱ्हाडची उदयोन्मुख नेमबाज शीतल थोरात हिने व्यक्त केला. शीतलने पुण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सोनेरी कामगिरी केली. कऱ्हाडसारख्या छोटय़ाशा शहरात ती गेली पाच वर्षे मोठा भाऊ सारंगच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. गेल्या वर्षी जर्मनीतील जागतिक स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती, मात्र व्हिसा न मिळाल्यामुळे तिला या स्पर्धेवर पाणी सोडावे लागले होते. असे असले तरी कधी तरी आपल्याला पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भाग घेता येईल, याची खात्री तिला आहे. शीतलच्या नेमबाजीतील आतापर्यंतच्या वाटचालीविषयी केलेली ही बातचीत-

नेमबाजीमध्येच कारकीर्द घडवण्याचा निर्णय तू का घेतलास?
लहानपणी या खेळात मी कारकीर्द करेन, असे कधी वाटले नव्हते. शालेय जीवनात मी अ‍ॅथलेटिक्स स्पर्धामध्ये ४०० व ८०० मीटर शर्यतींमध्ये भाग घेत असे. या क्रीडा प्रकारांमध्ये मी राज्य स्तरावर प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर मी वेटलिफ्टिंगकडे वळले. मी राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदकही मिळवले होते. मात्र या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी अनेक खेळाडू उत्तेजकांचा आधार घेतात, असे मी ऐकले होते आणि मला तो मार्ग स्वीकारायचा नव्हता. माझा भाऊ सारंग हा नेमबाजीत असल्यामुळे माझ्या वडिलांनी मला नेमबाजीत कारकीर्द करण्याचा सल्ला दिला व तो मी मान्य केला.

कऱ्हाडमध्ये नेमबाजीच्या सुविधा कशा आहेत?
नेमबाजीत कारकीर्द घडवायची असेल तर कोल्हापूरला सरावासाठी जावे लागणार होते. त्यामुळे वडिलांनी आमच्या घरातच मध्यम स्वरूपाचे नेमबाजी केंद्र तयार केले. त्यामुळे मी व सारंग आम्हा दोघांनाही नित्यनेमाने कोणताही व्यत्यय न येता सराव करता येतो. सारंग हा रायफलमध्ये कारकीर्द घडवत आहे. मी दररोज सकाळी दोन तास व सायंकाळी दोन-अडीच तास नेमबाजी करते. तसेच दररोज पूरक व्यायाम, एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यानधारणा, योगासन व प्राणायामही करते. माझे आईवडील व काका यांचे सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन आम्हा भावंडांना मिळत असल्यामुळेच आम्ही या खेळात कारकीर्द करू शकलो आहोत.

या खेळात तुझ्यापुढे कोणत्या खेळाडूचा आदर्श आहे?
खरे तर माझ्यापुढे कोणत्याही खेळाडूचा आदर्श नाही. मात्र मला जेव्हा-जेव्हा आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर स्पर्धा करण्याची संधी मिळते, तेव्हा-तेव्हा मी त्यांच्याकडून माझ्या कारकीर्दीसाठी बहुमोल ‘टिप्स’ मिळविण्याचा प्रयत्न करत असते. तेजस्विनी सावंत हिच्यासह अनेक अनुभवी खेळाडूंकडून मला बरेच काही शिकायला मिळाले आहे.

व्हिसा न मिळाल्यामुळे जागतिक स्पर्धेची संधी हुकल्यावर तुझी स्थिती काय होती?
जर्मनीतील जागतिक स्पर्धा ही माझ्यासाठी पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. मात्र ही संधी हुकल्यामुळे मी खूप निराश झाले होते. तीन महिने मी हातात पिस्तूल घेतले नव्हते. मी पूर्ण वेळ माझ्या शिक्षणासाठी देऊ लागले. आता नेमबाजी करायची नाही, असे मी ठरवले होते. त्यानंतर माझ्या घरच्यांनी माझी समजूत काढली. आमच्या संघाला व्हिसा नाकारला होता. त्यात माझा काही दोष नाही, असे त्यांनी मला समजावून सांगून पुन्हा नेमबाजी करण्याचा आग्रह केला. अखेर मी पुन्हा सराव सुरू केला.

अ‍ॅथलेटिक्स किंवा वेटलिफ्टिंग खेळाऐवजी नेमबाजीत कारकीर्द करण्याचा पश्चात्ताप होतो का?
कधीच नाही. नेमबाजी हाच माझा श्वास आहे. अ‍ॅथलेटिक्स व वेटलिफ्टिंगमधील स्पर्धात्मक अनुभव मला नेमबाजीतील स्पर्धासाठी सतत प्रोत्साहन देत असतो. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न आहे. ते साकारण्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्याची मी मानसिक तयारी केली आहे. हे ध्येय मी साध्य करू शकेन, असा विश्वास आहे.