भारताचा विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत आघाडीवीर सर्जी कजॉकिन याला बरोबरीत रोखले, मात्र कजॉकिन याने साडेचार गुणांसह सहाव्या फेरीअखेर आघाडी कायम ठेवली  आहे. स्पर्धेच्या उर्वरित तीन फे ऱ्या बाकी असून कजॉकिन याला विजेतेपद मिळविण्याच्या चांगल्या संधी आहेत. जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू मॅग्नुस कार्लसन याने चार गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. लिवॉन आरोनियन, हिकारु नाकामुरा यांचे प्रत्येकी साडेतीन गुण आहेत तर आनंद, पीटर स्वेडलर यांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत. कजॉकिनविरुद्धच्या डावात सुरुवातीपासून आनंदची बाजू थोडी वरचढ होती. मात्र कजॉकिन याने कल्पक चाली करीत बचावात्मक खेळ केला आणि आनंदला आक्रमणाची फारशी संधी दिली नाही. अखेर दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली. कार्लसन याने अझरबैजानच्या तैमूर रादजाबोव्ह याच्यावर मात केली. आरोनियन याने सुरेख खेळ करीत स्थानिक खेळाडू जॉन लुडविग हॅमर याला पराभूत केले.