भारताचा विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत मंगळवारी लिवॉन आरोनियनविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली.
या स्पर्धेत आनंदला अद्याप विजयाची संधी साधता आलेली नाही. काल त्याला ल्युक मॅकशेनीविरुद्धचा डाव अनिर्णीत ठेवावा लागला होता. अन्य लढतीत जागतिक क्रमवारीतील अव्वल दर्जाचा खेळाडू मॅग्नुस कार्लसन याला व्लादिमीर क्रामनिकने बरोबरीत रोखले. मायकेल अ‍ॅडम्सने महिलांची अव्वल दर्जाची खेळाडू ज्युडिथ पोल्गार हिच्याविरुद्धचा डाव बरोबरीत ठेवला. स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या गेवेन जोन्स या ब्रिटिश खेळाडूने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याच्याशी बरोबरी स्वीकारली.
कार्लसन व क्रामनिक यांनी सात गुणांसह संयुक्त आघाडी घेतली आहे. अ‍ॅडम्सचे सहा गुण झाले आहेत. नाकामुरा याचे चार गुण झाले आहेत. आनंद व जोन्स यांचे प्रत्येकी दोन गुण असून पोल्गार, आरोनियन व मॅकशेनी यांनी प्रत्येकी एक गुण मिळविला आहे.
लागोपाठ दोन डाव गमावल्यामुळे आरोनियन याच्यावर खूप दडपण आले होते. त्यामुळेच त्याने स्लाव्ह डिफेन्समध्ये सावध खेळ केला. वजिराच्या बाजूवर त्याने केलेले आक्रमण रोखण्यात आनंदला काही मोहरे गमवावे लागले. त्याने एक प्यादे जिंकले, मात्र तरीही डावातील गुंतागुंत कमी झाली नाही. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना बरोबरी स्वीकारण्याखेरीज अन्य कोणताच पर्याय उरला नव्हता.