क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा पंजाब दा पुत्तर युवराज सिंग अँग्री यंग मॅनच्या अवतारात असे. छोटय़ा कारणांनी त्याला चटकन राग येत असे. अशाच एका प्रसंगात युवराजने आपला राग काढला. त्याच्या या कृतीने सचिन भडकला आणि त्याने युवराजला वडीलकीचा सल्ला दिला. या प्रसंगाने युवराजला चुक उमगली आणि त्याचा राग कायमस्वरुपी शांत झाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका सामन्यात कमी धावांवर बाद झाल्यानंतर युवराज सिंगने पॅव्हिेलियनमध्ये परतल्यानंतर आपला राग व्यक्त केला. त्याने आपली बॅट जमिनीवर आपटली आणि तिचे तुकडे सगळीकडे विखुरले. या वेळी सचिन तिथे उपस्थित होता. ‘‘त्याला माझे वागणे अजिबात आवडले नाही आणि तो रागावला. तु पैसा, रोजीरोटी क्रिकेटच्या माध्यमातून कमावतोस. त्यामुळे पुन्हा असे कधीही वागू नकोस.’’ असा सल्ला सचिनने दिल्याचे युवराजने सांगितले.