इलावेनिल वालारिवान हिला पदकाची हुलकावणी

भारताची अव्वल नेमबाज अपूर्वी चंडेला हिने आपली सुवर्ण कामगिरी कायम ठेवली असून जर्मनीतील म्युनिच येथे सुरू असलेल्या यंदाच्या वर्षांतील तिसऱ्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

जयपूरची नेमबाजी अपूर्वी हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत चीनच्या वँग लुयाओ हिला मागे टाकत २५१ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीत लुयाओ हिला २५०.८ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या झु हाँग हिने २२९.४ गुणांसह कांस्यपदक पटकावले.

अपूर्वी आणि वँग यांच्यात सुवर्णपदकासाठी कडवी चुरस रंगली होती. अखेरचा लक्ष्यभेद करण्यापूर्वी अपूर्वी अवघ्या ०.१ गुणांनी आघाडीवर होती. मात्र अपूर्वीने १०.४ असा वेध घेत अग्रस्थानी झेप घेतली. वँगला अखेरच्या प्रयत्नांत १०.३ इतकेच गुण मिळवता आले. अपूर्वीचे हे आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील या वर्षांतील दुसरे तर कारकीर्दीतील चौथे सुवर्णपदक ठरले. याआधी फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली होती. भारताची अन्य नेमबाज इलावेनिल वालारिवान हिनेही अपूर्वीसह अंतिम फेरीत मजल मारली होती. मात्र तिला ०.१ गुणांनी पदकाने हुलकावणी दिली. इलावेनिल हिने २२९.३ गुणांसह चौथे स्थान प्राप्त केले.

महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात, आशियाई सुवर्णपदक विजेती राही सरनोबत हिने पात्रता फेरीत २९४ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. सोमवारी जलद फेरी होणार असून तिला पदकासह ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित करण्याची सुवर्णसंधी आहे. मनू भाकर हिला २८९ गुणांसह २४व्या तर चिंकी यादव हिला २७६ गुणांसह ९५व्या स्थानावर समाधान मानावे लागले.