News Flash

T20 World Cup : भारतामध्ये आल्यावरही संघाचे टी-शर्ट्स मिळाले नव्हते!

विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपल्यावर मंडळाने आमच्या मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतला.

West indies T20 world cup, ,जगज्जेत्या वेस्ट इंडिजच्या पुरुष संघाचा कर्णधार डॅरेन सॅमी,महिला संघाची कर्णधार स्टेफनी टेलर
जगज्जेत्या वेस्ट इंडिजच्या पुरुष संघाचा कर्णधार डॅरेन सॅमी आणि महिला संघाची कर्णधार स्टेफनी टेलर यांचे सोमवारी कोलकाताच्या सुप्रसिद्ध व्हिक्टोरिया मेमोरियल उद्यानात खास छायाचित्रण झाले.

सॅमीने वाचला अन्यायाचा पाढा; अखेरचा विश्वचषक खेळणार असल्याचा वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला इशारा दिल्याची कबुली
विश्वचषक सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिजचे क्रिकेट मंडळ आणि खेळाडू यांच्यामध्ये मानधनाबाबत वाद निर्माण झाला होता. मंडळाने खेळाडूंना झुकवत त्यांच्या मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतला होता; पण खेळाडूंना विश्वचषक खेळायचा असल्यामुळे त्यांनी या लादलेल्या शर्ती मान्य केल्या; पण या वेळी वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीने मंडळाला एक पत्र लिहिले. यामध्ये त्याने हा विश्वचषक शेवटचा असल्याचे लिहिले होते.
याबाबत सॅमी म्हणाला की, ‘‘विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपल्यावर मंडळाने आमच्या मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आम्हाला मान्य नव्हता; पण T20 विश्वचषकासारख्या स्पर्धेत खेळायचे असल्याने आम्ही त्यांचा हा निर्णय अखेर मान्य केला, पण त्याच वेळी मी मंडळाला एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये जर हे असेच चालू राहिले तर माझी ही शेवटची स्पर्धा असेल, असे लिहिले होते. मी कर्णधाराला साजेशी कामगिरी करून दाखवली. आता निर्णय मंडळाच्या हातामध्ये आहे.’’
या प्रतिक्रियेसह सॅमीने आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाट मोकळी करून दिली. त्यापुढे जाऊन एक खुलासा करताना सॅमी म्हणाला, ‘‘विश्वचषकाला जाण्यापूर्वी संघाला सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी प्रत्येक क्रिकेट संघटना कटिबद्ध असते; पण तुम्हाला विश्वास बसणार नाही की, आम्ही विश्वचषकासाठी भारतामध्ये आलो तरी आम्हाला टी-शर्ट, टोप्या मिळाल्या नव्हत्या, अन्य सुविधा तर दूरच होत्या. आम्ही व्यवस्थापकांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांनी आम्हाला या गोष्टी लवकर मिळवून दिल्या, त्यामुळे या विजयात त्यांचेही योगदान आहे.’’

‘ती’ टीका प्रेरणादायी ठरली
विश्वचषकापूर्वी आमच्यावर टीकेचा भडिमार होत होता. एका जाणकाराने तर आपली पत सोडत आमच्यावर टीका केली. तो आपल्या स्तंभामध्ये म्हणाला होता की, ‘‘वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंना मेंदूच नाही.’’ त्याचे हे वक्तव्य जिव्हारी लागले आणि हेच आमच्या विश्वविजयासाठी प्रेरणादायी ठरले.

आम्ही सन्मान कमावला आहे
२०१२ साली आम्ही विश्वचषक जिंकला होता, तरीही या विश्वचषकामध्ये सहभागी होताना आमचा कोणीच सन्मान केला नाही. टीकाकार, स्वत:ला क्रिकेटचे जाणकार समजणाऱ्या व्यक्ती आणि पत्रकार यांनीही आम्हाला सन्मान दिला नाही. या सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आमच्या क्रिकेट मंडळानेही आम्हाला हवा तसा सन्मान दिला नाही. त्यामुळे या विश्वविजयासह आम्ही सन्मान कमावला आहे.

ही वेस्ट इंडिजसाठी नांदी ठरावी

२०१६ हे वर्ष आमच्यासाठी अविस्मरणीय असेच आहे. १९-वर्षांखालील मुलांनी विश्वचषक जिंकला. त्यानंतर महिला आणि पुरुष संघानेही विश्वचषक जिंकला. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेटला आता सुगीचे दिवस येतील, अशी आशा आहे. गतवैभव मिळवण्याची ही नांदी ठरावी, असे मला वाटते.

क्लाइव्ह लॉईड यांच्याशी तुलना नको

माजी कर्णधार क्लाइव्ह लाईड यांनी वेस्ट इंडिजला १९७५ आणि १९७९ साली विश्वचषक जिंकवून दिला होता. त्यानंतर सॅमीने वेस्ट इंडिजला दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकवून दिला आहे; पण या वेळी माझी लॉईड यांच्याशी तुलना करणे योग्य नाही.

अखेरच्या षटकातही विश्वास होता

अंतिम षटकात विजयासाठी १९ धावांची गरज असताना खेळाडूंवर माझा विश्वास होता, कारण हीच गोष्ट आमच्याकडे होती. कालरेस ब्रेथवेट हा किरॉन पोलार्डच्या जागी संघात आला आहे आणि तो त्याच्यासारखाच धडाकेबाज फलंदाजी करतो. पहिले दोन षटकार लगावल्यावर आम्हाला हायसे वाटले. तिसरा षटकार लगावल्यावर दिनेश रामदिन मैदानावर धावतही गेला होता आणि अखेरचा षटकार आम्हाला सारे काही देऊन गेला, जे शब्दातीत करता येणार नाही.

चाहत्यांना विश्वचषक समर्पित

या विश्वचषकापूर्वी आम्हाला चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. आमच्या पाठीशी फक्त चाहतेच होते, त्यामुळे हा विश्वविजय मी चाहत्यांना समर्पित करतो.

वेस्ट इंडिजची मदर तेरेसा मिशनरीला देणगी
एकिकडे वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंना वेळेवर टी-शर्ट मिळाले नाही. त्यांचे मानधनही कमी करण्यात आले आहे, ते फारच अत्यल्प असल्याचे म्हटले जाते. या साऱ्या गोष्टींमधून एक चांगला आदर्श वेस्ट इंडिज संघाचे व्यवस्थापक रॉल लुइस यांनी दाखवून दिला आहे. त्यांनी संघाकडून कोलकातामधील मदर तेरेसा मिशनरीला संघातर्फे देणगी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2016 3:33 am

Web Title: arrived without jersey windies take home the world t20 trophy
टॅग : Icc T20 World Cup
Next Stories
1 पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचा युनूस यांचा राजीनामा
2 जागतिक ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व कोहलीकडे
3 मलेशिया बॅडमिंटन स्पर्धा : सातत्यपूर्ण प्रदर्शनासाठी सायना आतूर
Just Now!
X