तुषार वैती

जीर्ण झालेली पाने गळून पडल्यानंतर झाडाला चैत्र महिन्यात नवी पालवी फुटू लागते. क्रीडाक्षेत्रालाही हा निसर्गनियम लागू होतो. सध्या भारताच्या क्रीडाक्षेत्रातही चैत्रपालवी फुटली आहे. ताज्या दमाच्या नव्या खेळाडूंमुळे भारताच्या क्रीडाक्षेत्रातही अपेक्षांचे वारे वाहू लागले आहेत. हिमा दास, मनू भाकर, नीरज चोप्रा, पृथ्वी शॉ, सौरभ चौधरी यांसारख्या युवा खेळाडूंचा बोलबाला सध्या सुरू झाला आहे. कठीण परिस्थितीतून खडतर संघर्ष करत पुढे येत या खेळाडूंनी नव्या युगाची आशा दाखवून दिली आहे. हे खेळाडू कसे घडले? गरीब कुटुंबात जन्म घेऊनही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप कशी घेतली? त्यांची ही संघर्षगाथा..

*  मनू भाकर

हरयाणातल्या झज्जर तालुक्यातील गोरिया गावात जन्मलेल्या आणि नौदलात अभियंते असलेल्या रामकिशन आणि एका शाळेत प्राध्यापिका असलेल्या सुमेधा यांची मुलगी म्हणजे मनू भाकर. तिच्या वयाची मुले खेळण्यात व्यग्र असताना मनू मात्र एका बंदिस्त खोलीत एक हात खिशात घालून दुसऱ्या हातात बंदूक धरून १० मीटर अंतरावर असलेल्या एका काळ्या ठिपक्यावर लक्ष्यवेध करण्यात गुंग असायची. आपल्यातील कौशल्यगुण अधिक विकसित करण्यासाठी तिची धडपड सुरू होती. सुरुवातीला खेळण्यातील पिस्तूल आणि गोळ्यांनी सराव केल्यानंतर वडिलांनी दीड लाखांची पिस्तूल घेऊन दिल्यावर २०१६मध्ये  व्यावसायिक नेमबाजीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. महान पिस्तूल नेमबाज जसपाल राणा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत मनूने अवघ्या दोन वर्षांतच गरुडभरारी घेतली आहे. पहिल्याच वर्षी राष्ट्रीय स्पर्धामध्ये तब्बल १५ पदके पटकावणाऱ्या मनूने २०१८मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेसह युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. आता २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी तिच्याकडे मोठय़ा आशेने पाहिले जात आहे.

*  पृथ्वी शॉ

वडिलांचा कपडय़ाचा व्यवसाय कसाबसा सुरू असताना लहान वयातच पृथ्वी शॉ याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. आईचे छत्र हरवल्यानंतर वडील पंकज यांनी व्यवसायाचा गाशा गुंडाळत पृथ्वीच्या क्रिकेट कारकीर्दीवर लक्ष द्यायचे ठरवले. लहान वयातच खांद्यावर क्रिकेटचे साहित्य घेऊन पृथ्वी विरार ते वांद्रे (एमआयजी क्लब) हा ५०-६० किलोमीटरचा प्रवास करू लागला. कोवळ्या वयात आपल्यापेक्षा अधिक वजनाचे ओझे घेऊन विरारच्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या पृथ्वीचे हाल त्याच्या वडिलांनाच पाहवत नव्हते. त्यानंतर त्यांनी थेट सांताक्रूझ येथे एका छोटय़ाशा भाडय़ाच्या खोलीत स्थलांतर केले. रिझवी शाळेत प्रवेश घेतल्यानंतर पृथ्वीच्या कलागुणांना खऱ्या अर्थाने पैलू पडण्यास सुरुवात झाली. वयाच्या १४व्या वर्षी शालेय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५४६ धावांची खेळी करून पृथ्वीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार, दुलीप करंडक, रणजी करंडक आणि कसोटी क्रिकेटच्या पदार्पणात शतकी खेळी करणाऱ्या पृथ्वीकडे ‘उद्याचा सचिन तेंडुलकर’ म्हणून पाहिले जात आहे.

*  हिमा दास

आसाममधल्या धिंग येथील कांधुलिमारी गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हिमा दासचा संपूर्ण वेळ शेतात जायचा. आपल्या अन्य पाच भावंडांप्रमाणे तिला घरकाम करण्याची सक्ती तिच्या आईने कधीच केली नाही. त्यामुळे मुलांसोबत फुटबॉल खेळणे असो वा हिरव्यागार शेतांमधून धावणे असो. बेधडक आणि बिनधास्त वृत्तीची हिमा सर्वच आघाडय़ांवर पुढे असायची. तिच्यातील गुणवत्ता ओळखून प्रशिक्षक निपॉन दास यांनी तिला गुवाहाटीत येण्याचा सल्ला दिला. हिमा आपल्या गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करणार अशी खात्री असलेल्या तिच्या वडिलांनी लगेच होकार दर्शवला. त्यानंतर देशाला अ‍ॅथलेटिक्समधला नवा तारा मिळाला. ४०० कि.मी. शर्यतीत तिने आपल्या वेगाने सर्वानाच थक्क केले आहे. फिनलँडमधील जागतिक अिजक्यपद शर्यतीत ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय धावपटू असा नावलौकिक तिने मिळवला. आता नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने वैयक्तिक रौप्यपदकासह महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले आणि ४ बाय ४०० मिश्र रिले शर्यतीत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकावून छाप पाडली आहे. देशाच्या सीमेवरून होणारी घुसखोरी आणि अवैध दारूविरोधात आवाज उठवणाऱ्या हिमाच्या रूपाने नेहमी बलात्कारासारख्या घटनांमुळे बदनाम झालेल्या धिंग तालुक्याला आणि देशाला एक नवा हिरा सापडला आहे.

*  नीरज चोप्रा

हरयाणातल्या पानिपत येथील खांडरा गावात जन्मलेला नीरज चोप्रा क्रिकेट आणि व्हॉलीबॉल या खेळात निष्णात होता. एका व्हॉलीबॉल स्पर्धेदरम्यान त्याचा वेग आणि शारीरिक क्षमता पाहून जयवीर सिंग यांनी त्याच्या हातात भाला सोपवला. सुरुवातीच्या यशानंतर त्याला सराव आणि प्रशिक्षणासाठी पैसे कमी पडू लागले. अखेर सराव सुरू ठेवण्यासाठी त्याने सैन्यदलात नोकरी पत्करली. ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक गॅरी कॅल्वर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली भालाफेकीतील बारकावे शिकणाऱ्या नीरजने २०१६च्या जागतिक कनिष्ठ अिजक्यपद शर्यतीत ८६.४८ मीटर अशी कामगिरी करत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर २०१८च्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक आपल्या नावावर करणाऱ्या अवघ्या २० वर्षांच्या नीरजने ८८.०६ मीटर अशी कामगिरी करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यामुळे दिवसेंदिवस कामगिरीत सुधारणा करणाऱ्या नीरजने ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक पटकावल्यास आश्चर्य वाटायला नको.

tushar.vaity@expressindia.com