डॉ. प्रकाश परांजपे

‘‘छोटू, आत टय़ूब भकभक करते आहे, ते बघ जरा,’’ असं  दोन दस्त झाल्यानंतर खेळ थांबवून आबा म्हणाले. ‘‘आबा, तो डिस्को लेसर दिवा आहे, देवघरात नवीन लावला आज. नरेशभाईंनी स्वस्तात दिला. बनारसला कार्तिकी पौर्णिमेला लेसर शो केला होता तसाच आपल्या देवघरात पण!’’ छोटू उत्तरला.

‘‘आम्ही वर गेल्यानंतर देव पण नवीन आण पाहिजे तर, पण आधी तो दिवा बंद कर,’’ असं आबा जरा रागावूनच म्हणाले.

आबांच्या ६ इस्पिक ठेक्याविरुद्ध ख्रिसने बदाम दश्शीची भवानीची उतारी केली. बदाम दश्शी-५-राणी-एक्का असा पहिला दस्त झाला, तर दुसऱ्या दस्ताला आबांनी इस्पिक एक्का  वाजवला. तिसऱ्या दस्ताचं पान खेळण्याआधी आबांनी त्या डिस्को दिव्याचा समाचार घेतला.

एवढय़ात मेनन बंधू अमेरिकेतला फोन घेण्यासाठी घरी गेले आणि आबांना विचार करायला भरपूर वेळ मिळाला. हिरमुसला झालेल्या छोटूला बोलावून त्यांनी डावाचा खुलासा केला. ‘‘८ इस्पिक, दोन बदाम, आणि किलवर एक्का असे ११ दस्त खणखणीत आहेत. १२व्या करता किलवर पंथ हा एकाच पर्याय आहे. समजा, किलवर गुलाम ख्रिसकडे आणि राजा भास्करकडे असेल आणि आपण त्यांना किलवर खेळायला भाग पाडलं तर काय होईल?’’ असं आबांनी विचारलं.

‘‘आपल्याला आणखीन एक किलवरचा दस्त मिळेल. भास्करकाका छोटं किलवर खेळले तर आपण हातातून छोटं खेळू आणि राणीचा दस्त जास्त मिळेल आणि ख्रिसकाकाने किलवर पंथाला हात घातला तर तो गुलाम खेळून आला काय किंवा छोटं पान खेळला काय, आपल्याला एक्का-दश्शी या युतीमुळे एक दस्त अतिरिक्त मिळेल,’’ छोटू उत्तरला.

‘‘बरोबर आहे. पण त्याकरता ते इस्पिकवर काय पानं जाळतात ते बारकाईने बघणं जरुरी आहे. ती सटवी टय़ूब भकभकत असताना एकाग्रतेने खेळता येत नाही म्हणून तुला ती बंद करायला सांगितली मी,’’ आबा म्हणाले.

थोडय़ाच वेळात मेनन बंधू परत आले आणि खेळ सुरू झाला. आबांनी ८ इस्पिकचे दस्त वाजवले आणि त्यानंतर ते बदाम खेळून राजाने दस्त जिंकून बघ्याच्या हात पोचले. आता सगळ्यांकडे ३-३ पानं उरली होती, दोन किलवरची पानं आणि एक चौकटचं.  किलवर राजा आणि गुलाम या चित्रांना सोबत म्हणून दोन्ही मेनन बंधूंनासुद्धा इतर पानं जाळावी लागली होती. भास्करने राजा एकटा ठेवला असता तर आबा पटावरून छोटं किलवर खेळले असते आणि ख्रिसने गुलाम एकटा ठेवला असता तर आबांनी राणी लावून त्या एकटय़ा गुलामाला गुंडाळलं असतं. आबांनी प्रत्येक पानाचा बारकाईने माग ठेवत, हे ताडलं होतं. ११व्या दस्ताला आबा पटावरून चौकट खेळले. चौकट एक्का जिंकून ख्रिसला किलवर खेळावं लागलं. त्याने किलवर गुलाम लावला. आबांनी त्यावर राणी ठेवली. आता भास्कर काहीही खेळला असता तरी शेवटचे दोन दस्त आबांचेच होणार होते. एकाग्रतेचं फळ मिळालं.

देवाला अशीच एकाग्रता मिळाली तर माझ्या करिअरचंसुद्धा नक्कीच भलं होईल, छोटूने विचार केला. डिस्को दिवा दुसऱ्याच दिवशी नरेशभाईंना परत करायला म्हणून त्याने देवघरातून काढून पुडक्यात परत बांधून ठेवला.

panja@demicoma.com

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)