प्रशांत केणी

करोनामुक्तीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी दोन स्थानिक पंच नेमावेत, अशी शिफारस नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट समितीने केली आहे. ‘आयसीसी’च्या विशेष पंच श्रेणीत (एलिट पॅनेल) स्थान नसलेल्या भारतीय पंचांना कसोटी क्रिकेटचा पुरेसा अनुभवसुद्धा गाठीशी नाही. त्यामुळे भारतासाठीच ही शिफारस आव्हानात्मक ठरणार आहे.

क्रिकेटमध्ये पूर्वापार स्थानिक पंच नेमण्याचीच रीत होती. त्यामुळे अनेक वादंगसुद्धा झालेले आहेत. पायचीतचे निर्णय हे सर्वात वादग्रस्त ठरायचे. आपल्या देशाच्या संघासाठी पंचांकडून अनुकूल निर्णय देण्याच्या पक्षपातीपणाचा फटका अनेक संघांना बसला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानने सर्वप्रथम तटस्थ पंचांची मागणी केली होती. १९९४पासून प्रत्येक कसोटीसाठी एक तटस्थ पंच नेण्यास प्रारंभ झाला. याच वर्षीपासून तिसरा पंचसुद्धा अस्तित्वात आला. त्यानंतर २००२पासून कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही पंच तटस्थ देशांचे नेमण्याचा नियम लागू करण्यात आला. तेव्हापासूनच ‘आयसीसी’च्या विशेष पंच समितीचे महत्त्व अधारेखित झाले. एस. वेंकटराघवन, सुंदरम रवी आणि व्ही. के. रामास्वामी हे भारतामधील अग्रगण्य पंच. वेंकटराघवन आणि रवी यांचे पंचांच्या विशेष समितीतही स्थान होते. गतवर्षी रवी यांची विशेष समितीतून हकालपट्टी करण्यात आली. मैदानावरील पंच आणि तिसरे पंच म्हणून केलेल्या चुकांचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे सध्या तरी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधूनच दर्जेदार पंच घडत आहेत.

यानंतरची दुसरी श्रेणी म्हणजे ‘आयसीसी’ आंतरराष्ट्रीय पंचांची समिती. या समितीत सी. शमसुद्दीन, अनिल चौधरी, नितीन मेनन आणि वीरेंद्र शर्मा या चार भारतीय पंचांचा समावेश आहे. यापैकी फक्त मेनन यांच्याकडेच तीन कसोटी सामन्यांच्या पंचगिरीचा अनुभव आहे. त्यामुळे करोनामुक्तीनंतरच्या तात्पुरत्या रचनेकडे भारतीय पंच संधी म्हणूनही पाहू शकतात. ‘आयसीसी’च्या सामनाधिकाऱ्यांच्या विशेष श्रेणीत आधी गुंडप्पा विश्वनाथ होते, तर आता जवागल श्रीनाथ आहे. दुसऱ्या श्रेणीच्या आंतरराष्ट्रीय सामनाधिकाऱ्यांच्या समितीत मनू नायर, व्ही. नारायण कुट्टी यांच्यासह जी. एस. लक्ष्मी या महिलेचाही समावेश आहे. तर विकसनशील पंचांच्या समितीत जनानी नारायणन आणि वृंदा राठी या महिलांनी स्थान मिळवले आहे. म्हणजेच भारतीय पंचक्षेत्रातील महिलांची मुसंडी ही लक्षणीय म्हणता येईल.

चार्लस बॅनरमॅन, मार्क बेन्सन, जॉन हॅम्पशायर, पीटर विली, इयान गोल्ड, जेम्स लिलीव्हाइट ज्युनियर, अशोका डिसिल्व्हा, कुमार धर्मसेना, पॉल रायफेल, रिचर्ड इलिंगवर्थ हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निवृत्तीनंतर पंच झाले. कसोटी क्रिकेट गाजवणारे माजी फिरकी गोलंदाज वेंकटराघवन यांच्याप्रमाणे पंचगिरीचा मार्ग पत्करणारे भारतात कमीच आढळतात. निवृत्तीनंतर समालोचन, प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, संघटक असे उत्तम अर्थस्रोताचे मार्ग पत्करतात.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) क्रिकेटपटूंचा आराखडा उत्तमरीत्या आखण्यात आला आहे. परंतु पंच अकादमी आणि त्यांचा मानधन आराखडा अशा अनेक बाबतींत निष्काळजीपणा जपला जातो. देशातून दर्जेदार पंचांची निर्मिती व्हावी, या उद्देशाने २०१०मध्ये ‘बीसीसीआय’चे तत्कालीन अध्यक्ष शशांक मनोहर यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय पंच अकादमी सुरू केली. वेंकटराघवन यांच्याकडे अकादमीचे संचालकपद देण्यात आले. पण एन. श्रीनिवासन अध्यक्षपदी आल्यानंतर अकादमीचे महत्त्व कमी करण्याचे राजकारण सुरू झाले. आजही राष्ट्रीय स्तरावरील पंचांची माहिती, दूरचित्रवाणी अहवाल, आदी दस्तऐवज इथेच उपलब्ध आहे. पण अभ्यासक्रमांचे प्रमाण विकसित होण्याऐवजी कमी झाल्याने अकादमीच्या दर्जाचे पंचनिर्मितीचे कार्य येथून होत नाही.

याशिवाय पंचांचा अनादर भारतात प्रामुख्याने जाणवतो. गतवर्षीच्या इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) पंचगिरीवर भारतीय कर्णधार विराट कोहलीने तोफ डागली होती. पंचांनी डोळे उघडे ठेवावेत, हे ‘आयपीएल’ आहे, क्लब क्रिकेटचे सामने नाहीत, असे ताशेरे कोहलीने जाहीरपणे ओढले होते. मग एका सामन्यात क्रोधाने लालबुंद झालेल्या महेंद्रसिंह धोनीने थेट मैदानावर जाऊन पंचांनाच जाब विचारण्याचे धारिष्टय़ दाखवले होते. या दोन्ही प्रकरणांत भारतीय पंचांच्या चुका असल्या तरी त्यांना धारेवर धरण्यासाठी क्रिकेटच्या नियमांचा अवमान करणे अयोग्य आहे. काही महिन्यांपूर्वी रणजी सामन्यात पंचांच्या शुभमन गिलने पंचांनी बाद दिल्यामुळे त्यांना आक्षेपार्ह शब्दांत सुनावले होते. त्यानंतर पंचांनी चर्चेनंतर निर्णय बदलल्याच्या निषेधार्थ प्रतिस्पर्धी दिल्ली संघाने मैदान सोडले. परंतु सामनाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे १२ मिनिटांनी सामना सुरू झाला.

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांच्या ‘आयसीसी’ क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघ गेली अनेक वर्षे पहिल्या तीन क्रमांकांमध्ये हमखास असतो. इतकेच नव्हे, तर फलंदाजांच्या, गोलंदाजांच्या आणि अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीतही भारतीय क्रिकेटपटू अग्रेसर असतात. २०१८-१९च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामात २०१७ सामने झाले होते. हे इतके सारे क्रिकेट देशात होत असताना दर्जेदार पंचनिर्मितीमध्ये भारत पिछाडीवर असणे, ही खंत आहे.

prashant.keni@expressindia.com