ऋषिकेश बामणे

विश्वचषक क्रिकेट स्पर्धा म्हटली की सर्वच संघ बहुतांशी फलंदाजी आणि गोलंदाजी विभाग सक्षम करण्याकडे लक्ष केंद्रित करतात. मात्र प्रत्येक संघाच्या व्यूहरचनेत मोलाची भूमिका बजावतो तो त्या संघाचा यष्टीरक्षक. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकातसुद्धा जवळपास प्रत्येक संघाचा यष्टीरक्षक हा त्या संघाचा ‘पाठीचा कणा’ म्हणून कामगिरी बजावत आहे. सलामीवीर, मधली फळी किंवा अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यापासून ते यष्टीपाठून गोलंदाजांना व कर्णधाराला क्षेत्ररक्षण रचण्यासाठी मार्गदर्शन करण्यात यष्टीरक्षकाचे मोलाचे योगदान लाभते.

इतिहाससुद्धा उलगडून पाहिल्यास कुमार संगकारा (श्रीलंका), अ‍ॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), ब्रँडन मॅक्क्युम (न्यूझीलंड) यांसारख्या काही यष्टीरक्षकांची नावे विश्वचषकाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिली गेली आहेत. साहजिकच यष्टीरक्षकाचा उल्लेख होताच भारताच्या महेंद्रसिंह धोनीचे नावही महत्त्वाचे ठरते. गेली १५ वर्षे धोनीने भारतीय संघाला अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. कदाचित कारकीर्दीतील अखेरचा विश्वचषक खेळणाऱ्या ३७ वर्षीय धोनीइतके सामन्याची स्थिती वाचण्याचे ज्ञान सध्याच्या भारतीय संघात कोणाकडेही नाही. फलंदाजीत वेळोवेळी भरीव कामगिरी करणारा धोनी यष्टीरक्षणात त्यापेक्षाही अधिक धोकादायक ठरतो. ३४१ एकदिवसीय सामन्यांत तब्बल ३१४ झेल व १२० यष्टिचीत करणारा धोनी विशेषत: फिरकीपटूंना अत्यंत योग्य प्रकारे मार्गदर्शन करतो. धोनीला विश्वचषकात सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रमही खुणावत आहे. त्यामुळेच यंदा धोनीसाठी विश्वचषक जिंकून त्याला थाटात निरोप देण्यासाठी सर्व भारतीय खेळाडू उत्सुक असतील.

धोनी जी कामगिरी भारतासाठी करत आहे, तेच काम जोस बटलर इंग्लंडसाठी गेल्या एक-दोन वर्षभरापासून करत आहे. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला येत फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या बटलरने या विश्वचषकाच्या पहिल्या तीन सामन्यांत प्रत्येकी एक शतक व अर्धशतक झळकावले. मुख्य म्हणजे बटलर वेगवान गोलंदाजांबरोबरच फिरकीपटूंनाही तितक्याच कौशल्यतेने खेळतो. त्यामुळेच तो इंग्लंडच्या फलंदाजीचा महत्त्वाचा घटक आहे. बटलरसारखीच भूमिका क्विंटन डी’कॉक दक्षिण आफ्रिकेसाठी बजावतो आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एबी डी’व्हिलियर्सने निवृत्ती पत्करल्यानंतर फॅफ डय़ू प्लेसिस आणि हशिम अमला यांच्याकडून सर्वाना अपेक्षा होत्या. मात्र ते अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयशी ठरत असताना डी’कॉक सलामीला येऊन आफ्रिकेची फलंदाजी सांभाळत आहे. त्याशिवाय भारताविरुद्ध त्याने कोहलीचा पकडलेला एकहाती झेलसुद्धा डोळ्यांचे पारडे फेडणारा होता.

न्यूझीलंडच्या टॉम लॅथमला अद्याप फलंदाजीत आपली छाप पाडण्याची फारशी संधी मिळाली नसली तरी यष्टीरक्षणात त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तब्बल पाच झेल पकडून न्यूझीलंडसाठी नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्याला ज्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम मोडण्याची संधी होती तो म्हणजे पाकिस्तानचा सर्फराज अहमद. सर्फराजने २०१५च्या विश्वचषकातील स्वत:च्या पहिल्याच सामन्यात तब्बल सहा झेल घेतले. त्याशिवाय ४९ धावाही केल्या. त्या विश्वचषकात सर्फराजने पाकिस्तानतर्फे शतक झळकावणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज होण्याचा मान मिळवला. पुढे सर्फराजच्याच कल्पक नेतृत्वाखाली पाकिस्तानने २०१७च्या चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरले. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकातही आतापर्यंत एक अर्धशतक झळकावणाऱ्या सर्फराजकडून सर्व पाकिस्तानी चाहत्यांची हीच अपेक्षा असेल.

क्रमवारीत तळाच्या स्थानांवर असलेल्या यष्टीरक्षकांवर नजर टाकल्यास बांगलादेशचा मुशफिकर रहिम आणि अफगाणिस्तानचा मोहम्मद शहझाद यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. विशेषत: रहिम गेली अनेक वर्षे संघाच्या फलंदाजीची धुरा वाहत आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर तर त्याचा खेळ अधिक बहरला आहे. या विश्वचषकात त्याने फलंदाजीत योगदान दिले आहे, मात्र यष्टीरक्षणात त्याला अजून सुधारणा करावयाची आवश्यकता आहे. अफगाणिस्तानला मात्र मोहम्मद शेहझादने गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे भले मोठे नुकसान झाले आहे. आशिया चषकात शहझादने अफगाणिस्तानतर्फे सर्वाधिक धावा केल्या होत्या. मुख्य म्हणजे भारताविरुद्धच्या ‘टाय’ सामन्यात त्याने झळकावलेले शतक संस्मरणीय होते. एकूणच सर्व संघांचा आलेख पाहता स्पर्धेच्या शेवटी एखादा यष्टीरक्षकच स्पर्धेच सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी ठरल्यास कोणालाही आश्चर्याचा धक्का बसणार नाही.

विश्वचषकात सर्वाधिक बळी मिळवणारे यष्टीरक्षक

 खेळाडू                 बळी (झेल+यष्टिचीत)

कुमार संगकारा       ५४ (४१+१३)

अ‍ॅडम गिलख्रिस्ट    ५२ (४५+७)

महेंद्रसिंह धोनी      ३३ (२७+६)

ब्रँडन मॅकक्लम     ३२ (३०+२)

मार्क बाऊचर         ३१ (३०+१)