02 March 2021

News Flash

मुंबईचं ‘सिंहा’वलोकन होणार तरी कधी?

मुंबईच्या क्रिकेटची सध्याची वाताहत सर्वाच्याच परिचयाची आहे.

मुंबईच्या क्रिकेटची सध्याची वाताहत सर्वांच्याच परिचयाची आहे. ती का, हे दोन किश्श्यांमध्ये सहज समजून घेता येईल. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अ‍ॅलन बोर्डर निवृत्त झाले. त्यानंतर तुम्ही काय करणार, हे त्यांना विचारले गेले. त्यावर त्यांचं उत्तर एवढंच होतं की, ‘‘पुढील ७-८ वर्षे मी फक्त कनिष्ठ गटांतील क्रिकेट पाहणार आहे, कारण या संघातील खेळाडूंच देशाचे भविष्य असतात.’’ दुसरा किस्सा मुंबईतल्या एका निवडीच्या वेळचा. एक खेळाडू प्रशिक्षकांकडे आला आणि त्यांना म्हणाला की, तुम्हाला सरांनी फोन करायला सांगितला आहे. कशासाठी, तर निवडीसाठी. त्या प्रशिक्षकाने त्या युवा फिरकी गोलंदाजाला काही चेंडू टाकायला सांगितले. पहिला चेंडू उजव्या यष्टय़ांपासून ५ हात लांब होता, तर दुसरा चेंडू डाव्या यष्टांच्याही बाहेर. त्या प्रशिक्षकाने त्याची गोलंदाजी थांबवली आणि त्याला हे ‘सर’ कोण विचारले. त्याने दिलेले उत्तर धक्कादायक होते, कारण ते ‘सर’ भारताचे माजी कर्णधार होते. एवढय़ा मोठय़ा क्रिकेटपटूने असा वशिला लावावा, तर मुंबईच्या क्रिकेटचे काय होणार? या दोन किश्श्यांमधून तुम्हाला समजलं असेल मुंबई क्रिकेटची पीछेहाट कशामुळे होते. रणजीमध्ये आपली ससेहोलपट झाली. अन्य वयोगटांच्या स्पर्धामध्ये पानिपत. ही वेळ मुंबईवर का यावी?

पहिली गोष्ट म्हणजे आपल्या वयोगटांतील क्रिकेट संघांचे प्रशिक्षक कोण आहेत, यावर नजर टाका. यांच्यामधल्या किती प्रशिक्षकांनी रणजी स्पर्धा खेळल्या आहेत, याचे उत्तर तरी द्या. मुंबईतील नामवंत प्रशिक्षक बाहेरच्या राज्यांकडे का जातात, याचा विचार करायला हवा. कारण तुम्ही या प्रशिक्षकांना मानसन्मान आणि चांगले मानधन देता का? देत असाल तर मग चंद्रकांत पंडीत, लालचंद राजपूत, प्रवीण अमरे, सुलक्षण कुलकर्णी, साईराज बहुतुले यांच्यासारखे नावाजलेले प्रशिक्षक मुंबईकडे का टिकत नाहीत. या वर्षीचे चंद्रकांत पंडीत यांचे उदाहरण घ्या. विदर्भासारख्या संघाला ते अंतिम फेरीत घेऊन गेले. विदर्भाने इतिहास लिहिला आणि मुंबईच्या वाटय़ाला वाटाण्याच्या अक्षता. एका खेळाडूला संघात घ्या, हे सामन्याच्या पूर्वसंध्येला दूरध्वनी करून जिथे कार्यकारिणीतील मंडळीच सांगत असतील, तिथे या प्रशिक्षकांनी करायचे काय? मतांसाठी एवढं लाचार होणं कितपत योग्य, याचा विचार तरी करायला हवा.

वयोगटातील स्पर्धामध्ये गेल्या वर्षी मुंबईची चांगली कामगिरी होती, असे काही म्हणतीलही. पण या स्पर्धामधून किती खेळाडू आपण भारताला देऊ शकलो, याचे उत्तरही मिळत नाही. वेगवान गोलंदाजांसाठी जेफ थॉमसन यांच्यासारख्या दिग्गजांना पाचारण केले गेले, किती वेगवान गोलंदाज मुंबईला मिळाले? बीकेसीमधील अकादमीमधून किती वेगवान गोलंदाज मिळाले? मग तिथे नियुक्त केलेल्या संचालकांचे कर्तृत्व काय? त्यांच्यासाठी जेवढा पैसा खर्च केला गेला, त्याचे काय? वेगवान गोलंदाजांची निवड चाचणी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये घेण्याची पद्धत मुंबईत आहे. या महिन्यांमध्ये खेळपट्टी आणि वातावरण कसे असते, या वेळी वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी दाखवू शकतील का? हा साधा विचारही करता येत नसेल, तर आपल्या क्रिकेटची अवस्था दयनीय होणार हे नक्की. या महिन्यांमध्ये फिरकीपटू चांगली कामगिरी करतात. बळी मिळवतात, पण ते त्यानंतर गायब कुठे होतात, हेदेखील कळत नाही. गोलंदाजांसाठी वर्षभर प्रशिक्षण दिल्यानंतर ते मोठय़ा स्तरापर्यंत का पोहोचू शकत नाहीत?

आता विविध गटांतील स्पर्धामधल्या काही गंमती ऐका. १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये एका नामवंत माजी क्रिकेटपटूचा मुलगा असल्याचे सगळ्यांनाच माहीत आहे. ‘तो’ खेळाडू म्हणे संघासाठी ‘लकी’ आहे म्हणे. त्यामुळे त्याचे प्रशिक्षक कर्णधाराऐवजी ‘त्याला’ नाणेफेकीला पाठवण्याचा निर्णय घ्यायला निघाले होते. एवढा मूर्खपणाचा कळस जर प्रशिक्षक करत असेल तर त्यांचा दर्जा काय? जर तो खेळाडू संघासाठी ‘लकी’ आहे, तर मग तुम्ही विजेतेपद का पटकावू शकला नाही, याचे उत्तर अंधश्रद्धाळू प्रशिक्षकाकडे आहे का?

आता २३ वर्षांखालील क्रिकेटबद्दल बोलूया. खिझर दाफेदार हा खेळाडू लेग स्पिनर आणि फलंदाज आहे, असे दाखवले गेले. अकरा डावांमध्ये त्याच्या धावा १७१, सरासरी जवळपास अठराची. तरीही त्याला ११ सामने खेळण्याची संधी दिली जाते. पण त्याच्यासारखाच अष्टपैलू असलेला आणि एका नामांकित शील्डमध्ये सर्वोत्तम ठरलेला परीक्षित वळसणकरवर अन्याय का? त्याने चार सामन्यांमध्ये २० बळी मिळवले असतील तर त्याला  संघात स्थान मिळू नये? हा कुठला अजब न्याय? जर अभिषेक नायरसारख्या अनुभवी खेळाडूला तुम्ही महत्त्वाच्या सामन्यात संघाबाहेर काढता, तर दाफेदारला का नाही? अजून एक खेळाडू पोलीस शील्ड, पुरुषोत्तम शील्ड आणि अन्य एका शील्डमध्ये शतके लगावतो आणि त्याला तुम्ही फक्त एकच सामना खेळवता? हे सारे काय? कशासाठी? पापांचा घडा कधीतरी भरतोच, हे तरी लक्षात असू द्या.

क्रिकेट सुधारणा समिती काय करते, हे कुणी सांगेल का? वातानुकूलित कार्यालयात बसून त्यांनी भज्यांचा आनंद घ्यायचा की मैदानांवर जाऊन क्रिकेट बघायचे? यापूर्वी ही समिती कशी होती, याचे उदाहरण पाहा. साल २००५. एका प्रशिक्षकाने ‘लेव्हल-२’मध्ये अव्वल स्थान पटकावले होते. त्याचे या क्रिकेट सुधारणा समितीने कौतुक केले. पण तो कुठे क्रिकेट खेळला, यापूर्वी कुठे मार्गदर्शन केले, किती खेळाडू घडवले, हे कुणालाही माहिती नव्हते. कारण त्याचे कर्तृत्व तसे नव्हतेच. त्यामुळे या समितीने त्याला कुठलेही काम दिले नाही. कारण एवढेच होते की, ती व्यक्ती कोणत्या दर्जाचे खेळाडू घडवणार, हा प्रश्न समितीला पडला आणि त्यांनी त्याला नाकारले. आता २०१७ साल संपत आले, पण त्या व्यक्तीला कुठेही प्रशिक्षणाचे काम मिळू शकले नाही. अन्य राज्यांनीही त्याचा विचार केला नाही. एवढी दूरदृष्टी त्या वेळच्या समितीमध्ये होती. तुमची पात्रता काय, यापेक्षा तुम्ही भविष्य घडवू शकता की नाही, याचा विचार त्या वेळच्या समितीने केला. आताच्या समितीकडे ही दूर‘दृष्टी’ आहे का?

विविध वयोगटांच्या क्रिकेटमध्ये अनागोंदी कारभार आहे. गेल्या वर्षी निवडलेल्या खेळाडूंना या वर्षीही संघात स्थान दिले जाते. या वेळी १४ वर्षांखालील क्रिकेट खेळलेला खेळाडू आपसूकच १६, १९ आणि २३ वर्षांपर्यंतच्या क्रिकेटमध्ये पोहोचतो. गेल्या वर्षी एका खेळाडूची अव्वल ५० खेळाडूंमध्ये निवड केली होती, पण त्यानंतर पंधरा खेळाडूंचे चार संघ निवडीसाठी बनवले, त्यामध्ये त्याचे नावच नव्हते. म्हणजे एक खेळाडू अव्वल ५० जणांमध्ये असतो, पण ६० जणांमध्ये नाही! ही कॉमेडी सर्कस आहे का? अजूनही विद्यापीठ क्रिकेटचे सामने

कधी होणार, कुणी सांगेल का?

चांगल्या प्रशिक्षकांना तुम्हाला जपता आले नाही. वयोगटांतील संघांच्या प्रशिक्षकांचा दर्जा ठरवता आला नाही. क्रिकेट अकादमीमध्ये खेळाडू घडवता आले नाहीत. मतांच्या लाचारीसाठी खेळाडूंना संघाचा टिळा लावला जातो, अशा बऱ्याच गोष्टी घडत असताना तुमच्या क्रिकेटची प्रगती कुठल्या आधारावर होणार?  मुंबई क्रिकेट संघटनेच्या बोधचिन्हावर सिंह आहे. पण हा सिंह सिंहावलोकन करणार कधी, याचे उत्तर दर्दी मुंबईकरांना हवे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2017 2:15 am

Web Title: articles in marathi on mumbai cricket
Next Stories
1 ग्लोब सॉकरचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार ख्रिस्तियानो रोनाल्डोला
2 सुशील कुमार व परवीनच्या चाहत्यांमध्ये आखाडय़ाबाहेरच ‘बॉक्सिंग’चा खेळ
3 Ranji Trophy Final 2017 : ध्रुव शौरीच्या शतकाने पहिल्या दिवशी दिल्ली सुस्थितीत
Just Now!
X